फोटो सौजन्य - Social Media
एआय (AI) आणि तंत्रज्ञानाच्या झपाट्याने होत असलेल्या प्रगतीमुळे रोजगाराच्या संधींचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. जिथे काही नवीन नोकऱ्या निर्माण होत आहेत, तिथे अनेक पारंपरिक क्षेत्रांतील नोकऱ्या हळूहळू कमी होत चालल्या आहेत. त्यामुळे आजच्या काळात केवळ पदवी घेणे पुरेसे नसून, भविष्यातील रोजगाराच्या संधी लक्षात घेऊन अभ्यासक्रमाची निवड करणे अत्यंत गरजेचे बनले आहे. ‘इंडिया स्किल रिपोर्ट’नुसार काही अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे रोजगाराचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटताना दिसत आहे.
आयटीशिवाय केवळ सायन्स (नॉन-आयटी) अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पुढील काळ आव्हानात्मक ठरू शकतो. अहवालानुसार, अशा अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याची शक्यता सध्या सुमारे ६१ टक्क्यांपर्यंत मर्यादित राहिली आहे. त्यामुळे सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांनी केवळ पदवीवर न थांबता डेटा अॅनालिटिक्स, एआय, बायोटेक्नॉलॉजी, रिसर्च किंवा इंडस्ट्री-स्पेसिफिक स्किल्समध्ये विशेष प्रावीण्य मिळवणे आवश्यक ठरत आहे.
आर्ट्स (नॉन-टेक्निकल) अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीही रोजगाराची परिस्थिती फारशी समाधानकारक नाही. इंडिया स्किल रिपोर्टनुसार या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना नोकरी मिळण्याचे प्रमाण केवळ ५५.५५ टक्के आहे. म्हणजेच जवळपास निम्म्या विद्यार्थ्यांनाच रोजगार मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्ट्सच्या विद्यार्थ्यांनी कंटेंट रायटिंग, डिजिटल मीडिया, पब्लिक रिलेशन्स, डेटा इंटरप्रिटेशन, डिजिटल मार्केटिंग किंवा स्पर्धा परीक्षा अशा पूरक कौशल्यांकडे वळणे गरजेचे आहे.
काही वर्षांपूर्वी आयटीआय (व्यावसायिक) अभ्यासक्रमाला मोठी मागणी होती आणि या कोर्सनंतर सहज नोकरी मिळत होती. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. अहवालानुसार, केवळ आयटीआय अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी फक्त ४५.९५ टक्के लोकांनाच नोकरी मिळण्याची शक्यता आहे. आधुनिक यंत्रणा, ऑटोमेशन आणि स्मार्ट टेक्नॉलॉजीमुळे पारंपरिक आयटीआय कौशल्यांची गरज कमी होत आहे.
आयटीआयप्रमाणेच पॉलिटेक्निक (डिप्लोमा) अभ्यासक्रमांमध्येही रोजगाराच्या संधी घटताना दिसत आहेत. अहवालानुसार, केवळ ३२.९२ टक्के डिप्लोमा धारकांना नोकरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे केवळ डिप्लोमावर अवलंबून न राहता पुढील उच्च शिक्षण किंवा आधुनिक तंत्रज्ञानाशी संबंधित कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक बनले आहे.
या अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी घाबरण्याची गरज नाही. मात्र, स्वतःला अपडेट करणे अत्यावश्यक आहे. कोर्ससोबत स्पेशलायझेशन, सर्टिफिकेशन कोर्स, ऑनलाइन स्किल ट्रेनिंग, इंटर्नशिप आणि इंडस्ट्री एक्सपोजर मिळवणे भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकते. अनेक कंपन्यांचे सीईओदेखील आता विशिष्ट कौशल्य असलेल्या सर्टिफिकेशन धारकांना अधिक प्राधान्य देत असल्याचे मान्य करत आहेत. त्यामुळे पदवीपेक्षा कौशल्येच भविष्यातील खरे भांडवल ठरणार आहेत.






