फोटो सौजन्य - Social Media
जर तुम्हाला अजूनही असं वाटत असेल की मोठी सॅलरी फक्त IIT-NIT मधून शिकलेल्या विद्यार्थ्यांनाच मिळते किंवा पगार वाढवायचा असेल तर दरवर्षी नोकरी बदलणे हाच एकमेव मार्ग आहे, तर एका तरुण सॉफ्टवेअर इंजिनिअरची ही कहाणी तुमची ही समजूत बदलू शकते. टियर-3 कॉलेजमधून शिक्षण घेतलेल्या या इंजिनिअरने कोणताही नामांकित कॉलेजचा टॅग नसताना आणि वारंवार कंपनी न बदलता अवघ्या दोन वर्षांत आपली सॅलरी दुप्पट केली आहे. कधी महिन्याला २५ हजार रुपये कमावणारा हा तरुण आज तब्बल २४ लाख रुपये वार्षिक पॅकेजवर काम करत आहे.
या टेक प्रोफेशनलने २०२३ मध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगची पदवी पूर्ण केली. तो ज्या कॉलेजमधून शिकला, तिथे प्लेसमेंटच्या संधी फारशा नव्हत्या. मात्र, शेवटच्या वर्षाची वाट न पाहता त्याने तिसऱ्या वर्षातच इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला. त्याने एका स्टार्टअपमध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंटर्न म्हणून काम सुरू केले. सुरुवातीला त्याला २५ हजार रुपये मासिक स्टायपेंड मिळत होते. अवघ्या पाच महिन्यांतच त्याच्या कामगिरीचा प्रभाव दिसून आला आणि त्याचा पगार ३५ हजार रुपयांपर्यंत वाढवण्यात आला. या टप्प्यावर त्याला खऱ्या अर्थाने आत्मविश्वास आणि रिअल-वर्ल्ड अनुभव मिळाला.
फायनल इयरमध्ये त्याने आणखी एका स्टार्टअपमध्ये इंटर्न म्हणून काम सुरू केले. यावेळी त्याला ४५ हजार रुपये मासिक स्टायपेंड मिळत होते. सहा महिन्यांच्या मेहनतीनंतर त्या कंपनीनेच त्याला १२ लाख रुपये वार्षिक पॅकेजवर फुल-टाइम ऑफर दिली. हाच त्याच्या करिअरमधील मोठा ब्रेक ठरला. विशेष बाब म्हणजे फुल-टाइम नोकरी मिळाल्यानंतर त्याने कंपनी बदलली नाही. कामगिरीच्या जोरावर अवघ्या एका वर्षात त्याची सॅलरी वाढून १८ लाख रुपये वार्षिक झाली. पुढील अप्रेझलमध्ये हा आकडा थेट २४ लाख रुपयांपर्यंत पोहोचला. ना IITचा टॅग, ना सतत जॉब स्विच – फक्त सातत्यपूर्ण मेहनत आणि दर्जेदार काम यामुळेच त्याचे पॅकेज वाढत गेले.
या सॉफ्टवेअर इंजिनिअरने सांगितले की, त्याने पारंपरिक जॉब पोर्टल्सवर अवलंबून राहणे टाळले. त्याची रणनीती वेगळी होती. नव्याने फंडिंग मिळवणाऱ्या स्टार्टअप्सवर लक्ष ठेवणे, त्या स्टार्टअप्सच्या फाउंडर्सना लिंक्डइनवर शोधणे आणि थेट त्यांना मेसेज करून आपण कोणत्या रोलसाठी योग्य आहोत हे स्पष्टपणे सांगणे – ही पद्धत त्याच्यासाठी प्रभावी ठरली. त्याने हा अनुभव ‘Developers India Subreddit’वर शेअर केला असून, अनेक तरुणांसाठी ही कहाणी प्रेरणादायी ठरत आहे.
ही यशोगाथा एकच गोष्ट अधोरेखित करते – कॉलेजचं नाव नाही, तर कौशल्य, मेहनत आणि योग्य संधी ओळखण्याची दृष्टीच खऱ्या अर्थाने करिअर घडवते.






