
फोटो सौजन्य - Social Media
आसाम राज्यात सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आसाम राज्यस्तरीय पोलिस भरती मंडळ (SLPRB) यांनी वन विभाग, आसाम पोलिस तसेच अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागात मोठ्या प्रमाणावर भरती जाहीर केली आहे. या भरती मोहिमेअंतर्गत एकूण २,९७२ पदे भरली जाणार असून, यासाठी अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. दीर्घकाळापासून सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या तरुणांसाठी ही भरती सुवर्णसंधी मानली जात आहे.
SLPRB कडून जाहीर करण्यात आलेल्या माहितीनुसार, ही भरती विविध विभागांतील वेगवेगळ्या पदांसाठी केली जाणार आहे. यामध्ये वन विभागातील फॉरेस्टर ग्रेड-I, फॉरेस्ट गार्ड आणि गेम वॉचर पदांचा समावेश आहे. तसेच आसाम पोलिस दलामध्ये AFPF कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल (WO/WT), कॉन्स्टेबल (UB) आदी पदांवर भरती होणार आहे. याशिवाय अग्निशमन व आपत्कालीन सेवा विभागात फायरमॅन, इमर्जन्सी रेस्क्युअर, बोटमन, बँडमॅन आणि बिगुलर या पदांवरही नियुक्त्या केल्या जाणार आहेत.
एकूण २,९७२ पदांमुळे मोठ्या संख्येने तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. यामध्ये फॉरेस्टर ग्रेड-I चे २११ पदे, फॉरेस्ट गार्डचे ५०४ पदे आणि कॉन्स्टेबल ग्रेड-III चे ७३३ पदे समाविष्ट आहेत. याशिवाय कॉन्स्टेबल (WO/WT) चे ६४२ पदे आणि फायरमॅनचे ३३७ पदे आहेत. बँडमॅन, बिगुलर आणि बोटमन (केवट) यांसारख्या पदांसाठीही मर्यादित पण महत्त्वाची पदसंख्या ठेवण्यात आली आहे.
वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली आहे. फॉरेस्टर ग्रेड-I पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे. सब-ऑफिसर व कॉन्स्टेबल (WO/WT) पदांसाठी हायस्कूलसह विज्ञान शाखेत PCM विषय आवश्यक आहेत.
फॉरेस्ट गार्ड, गेम वॉचर आणि कॉन्स्टेबल (UB) पदांसाठी १२वी उत्तीर्ण किंवा समकक्ष पात्रता मागवण्यात आली आहे.
तर AFPF कॉन्स्टेबल, कॉन्स्टेबल ग्रेड-III, बँडमॅन व बिगुलर पदांसाठी १०वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. बोटमन पदासाठी १०वी सोबत पोहोण्याचे उत्तम ज्ञान व सराव आवश्यक आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना आसाम राज्य सरकारच्या नियमांनुसार आकर्षक वेतन दिले जाणार आहे. या पदांसाठी पे बँड-1 आणि पे बँड-2 अंतर्गत साधारणपणे १२,००० ते ७०,००० रुपये प्रतिमाह वेतन मिळू शकते. यासोबतच ग्रेड पे, महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व इतर शासकीय सुविधा दिल्या जाणार आहेत. त्यामुळे उमेदवारांना स्थिर आणि सन्मानजनक सरकारी नोकरी मिळणार आहे.
अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाईन आहे. इच्छुक उमेदवारांनी SLPRB च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. भरतीसंबंधी दिलेल्या लिंकवर क्लिक करून प्रथम नोंदणी करावी. त्यानंतर लॉग-इन करून अर्ज फॉर्म भरावा. वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील काळजीपूर्वक भरून फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे ठराविक फॉरमॅटमध्ये अपलोड करावीत.