फोटो सौजन्य - Social Media
MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (MIT-WPU) ने पुण्यात आयोजित केलेल्या दुसऱ्या नॅशनल सायंटिस्ट्स राउंड टेबल कॉन्फरन्स (NSRTC 2025) ची दिमाखदार सांगता झाली. या तीन दिवसीय कॉन्फरन्समध्ये देशभरातील 70 हून अधिक मान्यवर शास्त्रज्ञ, संशोधक आणि विचारवंत सहभागी झाले होते. यात 36 शांती स्वरूप भटनागर आणि पद्म पुरस्कार विजेत्यांचा समावेश होता. आंतरशाखीय चर्चेसाठी पूरक मंच तयार करत, विज्ञान, तंत्रज्ञान आणि धोरणांमध्ये नवे दृष्टीकोन मांडले गेले.
ही परिषद चार महत्त्वाच्या परिवर्तनकारी विषयांवर केंद्रित होती. आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI), अत्याधुनिक साहित्य आणि प्रक्रिया, डिजिटल परिवर्तन व शाश्वतता, तसेच आरोग्यसेवा, फार्मा आणि बायोटेक्नॉलॉजी. AI संदर्भात, तज्ज्ञांनी क्रिप्टोग्राफी, क्वांटम सायन्स, खगोलशास्त्र आणि शिक्षण क्षेत्रात AI चा वापर यावर चर्चा केली. AI मुळे भविष्यात विज्ञानातील नवकल्पनांची दारे खुली होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
अत्याधुनिक साहित्य आणि प्रक्रिया सत्रात नॅनोतंत्रज्ञान, सौरऊर्जा, 2D मटेरियल्स आणि मेटल सर्क्युलॅरिटी यावर चर्चा झाली. विशेषतः “ब्लॅक गोल्ड” नॅनोमटेरियलवरील संशोधन, आणि लिथियम-आयन बॅटरीपलीकडे स्वदेशी उर्जा साठवणूक पर्यायांच्या दिशेने वाटचाल याचे अधोरेखन झाले. आरोग्य क्षेत्रात AI आधारित औषध शोध, महामारीसाठीची जागतिक तयारी, आणि जीवनशैलीतील बदलांमुळे टाइप 2 मधुमेहास प्रतिबंध यावर भर देण्यात आला. बायोमटेरियल्स, रिजनरेटिव्ह मेडिसिन, आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांसाठी निदानविषयक नवसंशोधनाची चर्चा करण्यात आली.
शाश्वततेविषयक सत्रात ग्रीन केमिस्ट्री, अणु उर्जेतील भारताची क्षमता आणि सॉल्ट-टॉलरंट तांदळाच्या मदतीने शेती टिकवणे या संकल्पना समोर आल्या. या कॉन्फरन्समध्ये विज्ञानाच्या नैतिक आणि अध्यात्मिक बाजूंवरही भर देण्यात आला. डॉ. विश्वनाथ कराड आणि प्रो. आशुतोष शर्मा यांनी विज्ञान-आध्यात्म समन्वयाच्या गरजेवर भाष्य केले. डॉ. राहुल व्ही. कराड यांनी या परिषदेमुळे तरुणांना नाविन्य आणि संशोधनाकडे वळण्याची प्रेरणा मिळेल, असे मत मांडले. या उपक्रमातून भारताच्या ज्ञानाधिष्ठित भविष्यास दिशा देणारे टप्पे निश्चित झाले.