प्रतीक शिंदे यांनी मारले MPSC चे मैदान
पुणे: राज्य सेवा आयोगाच्यावतीने २०२३मध्ये घेण्यात आलेल्या महसूल सहायक परीक्षेत प्रतिक शिंदे यांनी यश संपादन केले असून त्यांची नियुक्ती वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयामध्ये झाली आहे. प्रतिक शिंदे यांच्या आई सरला या अंगणवाडी सेविका असून त्यांनी अतिशय कष्टपूर्वक आपल्या मुलाचे शिक्षण पूर्ण केले. त्यामुळे प्रतिक यांच्यासह सरलाताईंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या निवडीमुळे सर्व स्तरातून प्रतिक शिंदे यांचे कौतुक होत आहे.
एमपीएससीकडून नुकतीच महसूल सहायक पदांच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. प्रतिक शिंदे यांनी ११३व्या रँकने ही परीक्षा उत्तीर्ण केली. प्रतिक शिंदे यांच्या वडीलांचे अकाली निधन झाले. त्यानंतर आई सरला शिंदे यांनी मुलांचे शिक्षण पूर्ण केले. घरची परिस्थिती बेताची होती. त्याला भाऊ विशाल शिंदे यानेही साथ दिली.
प्रतिक शिंदे यांनीही छोटीमोठी कामे करत बारावीपर्यंतचे शिक्षण नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळेमध्ये पूर्ण केले. पुढे पुण्यातील एच व्ही देसाई अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. प्रतीक शिंदे हे मूळ नाशिक जिल्ह्यातील कळवण तालुक्यातील आहेत. ग्रामीण भागातून पुण्यात ते स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी आले. कठोर मेहनत करत प्रतीक शिंदे यांनी आज या पदापर्यंत मजल मारली आहे. चार वर्षांचे अथक परिश्रम आणि सातत्य यामुळे त्यांना महसूल सहायक पदाला गवसणी घालता आली. त्यामुळे आपल्या गावाचा नावलौकिक उंचावल्याचा आनंद वाटत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. कोणताही क्लास न लावता स्वअभ्यासाने हे यश मिळवले आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई आणि शिक्षकांकडून मिळालेल्या प्रेरणेला दिले आहे.
प्रतिक शिंदे यांचे शिक्षण एमए राज्यशास्त्र विषयात झाले असून ते सध्या कायद्याचाही अभ्यास करत आहेत. त्यांना वाचन आणि वक्तृत्वाची आवड आहे. शासकीय नोकरीच्या माध्यमातून लोकसेवाचा आदर्श उभारण्याचा त्यांचा संकल्प आहे. श्रीमाताजी निर्मलादेवी यांच्या सहजयोग ध्यानाच्या माध्यमातून आपल्याला अभ्यासासाठी प्रेरणा मिळाली आणि एकाग्रता साध्य करता आली, असे त्यांनी नमूद केले.
स्पर्धा परीक्षांचा अभ्यास खरोखरच आव्हानात्मक आहे. मात्र, अभ्यासामध्ये सातत्य असल्यास यश् मिळविता येते, हे मी माझ्या उदाहरणावरुन सांगू शकतो. तसेच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्याथ्र्यांनी वेळेबाबत काटेकोर राहिले पाहिजे. वेळेचे योग्य नियोजन करुन अभ्यास करावा, तसेच आपल्या यशाचा पाठपुरावा करताना एक डेडलाईन ठरवावी. त्यामुळे नैराश्य येणार नाही.
– प्रतिक शिंदे, महसूल सहायक