
फोटो सौजन्य - Social Media
या महत्त्वपूर्ण शैक्षणिक सोहळ्यासाठी भारत सरकारचे प्रमुख वैज्ञानिक सल्लागार प्रा. अजय कुमार सूद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून ते दीक्षांतपर भाषण करणार आहेत. विज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषाच्या क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
या समारंभाला विशेष अतिथी म्हणून चंद्रकांत पाटील, मंत्री उच्च व तंत्र शिक्षण तसेच संसदीय कार्य, महाराष्ट्र राज्य, इंद्रनील नाईक, राज्यमंत्री उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, तसेच मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, प्र. कुलगुरू प्राचार्य डॉ. अजय भामरे आणि कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमासाठी अधिसभा, व्यवस्थापन परिषद आणि विद्यापरिषद यांचे मान्यवर सदस्य, विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता व सहयोगी अधिष्ठाता, तसेच संलग्न महाविद्यालयांचे प्राचार्य, विभागप्रमुख आणि प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. पूजा रौंदळे यांनी दिली.
या दीक्षांत समारंभाचे आयोजन मुंबई विद्यापीठातील विविध विद्याशाखांमधून पदवी व पदव्युत्तर परीक्षा उत्तीर्ण होऊन पात्रता सिद्ध केलेल्या विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यासाठी करण्यात आले आहे. यावर्षीच्या दीक्षांत समारंभात दीड लाखाहून अधिक स्नातकांना विविध पदव्या प्रदान करण्यात येणार असून, हा समारंभ विद्यापीठाच्या इतिहासातील एक भव्य शैक्षणिक सोहळा ठरणार आहे. याचबरोबर विविध विद्याशाखांतील ५७७ संशोधक विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील २५६, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेतील १४४, मानव्यविज्ञान विद्याशाखेतील १०६, तसेच आंतर-विद्याशाखीय अभ्यासशाखेतील ७१ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
तसेच विद्यापीठाच्या विविध परीक्षांमध्ये विशेष प्राविण्य संपादन केलेल्या १९ विद्यार्थ्यांना २१ सुवर्णपदके मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. या गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये १२ मुली आणि ७ मुलांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे २ विशेष स्पर्धा पारितोषिके देखील यावेळी प्रदान करण्यात येणार आहेत. मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक परंपरेला साजेसा असा हा दीक्षांत समारंभ विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि अभिमानाचा क्षण ठरणार असून, उच्च शिक्षणाच्या क्षेत्रातील विद्यापीठाची भक्कम वाटचाल अधोरेखित करणारा ठरणार असल्याचे मत विद्यापीठ प्रशासनाने व्यक्त केले आहे.