
फोटो सौजन्य - Social Media
प्रॉक्टर अँड गॅम्बल इंडिया (P&G India) या आघाडीच्या आरोग्यसेवा आणि गृहउत्पादन क्षेत्रातील कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्वातून (CSR) पुन्हा एकदा महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘P&G शिक्षा’ या दीर्घकालीन सीएसआर उपक्रमाअंतर्गत कंपनीने वंचित आणि शिक्षणापासून दूर राहिलेल्या मुलांसाठी देशव्यापी स्वयंसेवक मोहिमेची घोषणा केली आहे. महिनाभर चालणाऱ्या या उपक्रमाद्वारे कंपनीचे कर्मचारी स्वतः शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना करिअरविषयक मार्गदर्शन, शिक्षणाचे महत्त्व, कौशल्य प्रशिक्षण आणि जीवन कौशल्यांविषयी माहिती देणार आहेत.
या उपक्रमाचा केंद्रबिंदू भिवंडी परिसरातील आदिवासी व ग्रामीण भागातील शाळांवर आहे. या भागात अनेक विद्यार्थी आर्थिक अडचणींमुळे किंवा संसाधनांच्या अभावामुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणापासून वंचित राहतात. त्यामुळे P&G ने या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विशेष योजना आखली आहे. कंपनीचे प्रशिक्षित कर्मचारी, विविध विभागांतील अधिकारी तसेच वरिष्ठ नेतृत्व स्वतः विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना भविष्यातील शैक्षणिक आणि करिअर मार्गांविषयी मार्गदर्शन करत आहेत. या उपक्रमात करिअर कसे निवडावे, कोणत्या क्षेत्रांत रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, कोणत्या कौशल्यांची आजच्या काळात जास्त मागणी आहे, उच्च शिक्षणासाठी उपलब्ध मार्ग आणि शासकीय योजना याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली जाते. विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांच्या शंकाही यावेळी प्रत्यक्ष दूर केल्या जात आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत असून, त्यांना भविष्यातील संधी दिसू लागल्या आहेत.
P&G शिक्षा उपक्रमाची सुरुवात 2005 साली झाली. तेव्हापासून कंपनीने शिक्षण क्षेत्रात सातत्याने सक्रिय भूमिका बजावत देशभरात मोठा सामाजिक बदल घडवून आणला आहे. गेल्या दोन दशकांत या उपक्रमाचा लाभ 50 लाखांहून अधिक वंचित मुलांना झाला आहे. शैक्षणिक पायाभूत सुविधा उभारणे, वर्गखोल्यांची दुरुस्ती, ई-लर्निंग साधनांची उपलब्धता, डिजिटल शिक्षण सामग्री, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा अशा अनेक गोष्टी कंपनीने शाळांना पुरवल्या आहेत.
कंपनीचे स्वयंसेवक दरवर्षी हजारो तास या उपक्रमासाठी देतात. त्यांचा एकमुखी अनुभव असा की, ग्रामीण आणि वंचित समुदायातील अनेक विद्यार्थी अत्यंत प्रतिभावान असतात, परंतु त्यांना योग्य मार्गदर्शनाची कमतरता असते. शिक्षणासाठी आवश्यक साधन-सामग्री मिळाल्यास आणि करिअरविषयक योग्य माहिती मिळाल्यास हे विद्यार्थीही उज्ज्वल भविष्य घडवू शकतात. त्यामुळे P&G शिक्षा हा उपक्रम मुलांच्या जीवनात “शिक्षणाचा प्रकाश” पोहोचवण्याचे कार्य करत आहे.
कंपनीच्या मते, शिक्षण हेच सामाजिक विकासाचे सर्वात प्रभावी साधन आहे. म्हणूनच त्यांचा उद्देश केवळ आर्थिक मदतीपुरता मर्यादित नसून, “शिक्षणातून सक्षमीकरण” हे आहे. या स्वयंसेवी मोहिमेद्वारे मुलांच्या केवळ शैक्षणिक गरजा पूर्ण होत नाहीत, तर त्यांना भविष्यासाठी आवश्यक असे कौशल्य, आत्मविश्वास आणि योग्य दिशादर्शन मिळत आहे. आगामी काळात P&G शिक्षा उपक्रम आणखी राज्यांपर्यंत पोहोचवण्याची, अधिक शाळांना जोडण्याची आणि लाखो विद्यार्थ्यांना मदत करण्याची कंपनीची योजना आहे. या उपक्रमांमुळे समाजातील दुर्लक्षित घटकांसाठी शिक्षणाची दारे अधिक मोठ्या प्रमाणात खुली होत आहेत आणि अनेक मुलांचे जीवन बदलण्याची संधी निर्माण होत आहे.