
फोटो सौजन्य- सोशल मीडिया
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्यसंवाद प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील विविध शैक्षणिक प्रकल्पांचे उद्घाटन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील 10 सरकारी वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित करण्याचा आरंभ केला आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स (IIS), मुंबई आणि महाराष्ट्राच्या विद्या समीक्षा केंद्र (VSK) चे उद्घाटन केले. या शैक्षणिक प्रकल्पांसोबतच नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अद्ययावतीकरणाची पायाभरणी आणि शिर्डी विमानतळावरील नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचा समावेश आहे. यावेळी राज्याचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी उपस्थित होते.
आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा ‘महायज्ञ’
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, देशाच्या विकासासाठी सरकारने आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करण्याचा ‘महायज्ञ’ सुरू केला आहे. लाखो लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी राज्यात 10 नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यात येत आहेत. यामुळे अंबरनाथ (ठाणे), मुंबई, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशीम, अमरावती, भंडारा आणि गडचिरोली हे जिल्हे लाखो लोकांसाठी सेवेची केंद्रे बनतील. महाराष्ट्रात आणखी 900 वैद्यकीय जागांची भर पडणार असून एकूण वैद्यकीय जागा 6000 झाली आहेत.
मराठी भाषेतून वैद्यकीय शिक्षण उपलब्ध
गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील जास्तीत-जास्त मुले डॉक्टर व्हावीत आणि त्यांची स्वप्ने पूर्ण व्हावीत हे सरकारचे प्राधान्य आहे. एकेकाळी अशा प्रकारच्या विशेष अभ्यासासाठी मातृभाषेतील पुस्तके उपलब्ध नसण्याचे मोठे आव्हान होते. यावर मात करण्यासाठी महाराष्ट्रातील तरुणांना मराठी भाषेतून वैद्यकीय शिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. मातृभाषेतून शिक्षण घेऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न तरुण पूर्ण करतील, असेही प्रधानमंत्री यांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले या दिग्गजांच्या आशीर्वादामुळेच महाराष्ट्रात प्रगतीची कामे सुरू असल्याचे प्रधानमंत्री यांनी सांगितले.
तरुणांना मोल्यवान अनुभव आणि नव्या संंधी
प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले की, जागतिक समुदाय भारताकडे मानवी संसाधनांसाठी एक महत्त्वपूर्ण केंद्र म्हणून पाहतो, ज्यामध्ये जगभरात शिक्षण, आरोग्यसेवा आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या मोठ्या संधी आहेत. या संधींसाठी भारतातील तरुणांना तयार करण्यासाठी, सरकार त्यांच्या कौशल्यांना जागतिक मानकांनुसार अद्ययावत करत आहे. शैक्षणिक आराखडा पुढे नेण्याच्या उद्देशाने विद्या समीक्षा केंद्रासह महाराष्ट्रात विविध प्रकल्पांचा आरंभ आणि मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्सच्या उद्घाटनाद्वारे तरुणांच्या कलागुणांना प्रशिक्षण दिले जाईल. विद्यार्थ्यांना त्यांच्या इंटर्नशिप दरम्यान 5,000 रुपये स्टायपेंड मिळेल. हजारो कंपन्या या उपक्रमाचा एक भाग होण्यासाठी नोंदणी करत आहेत ज्यामुळे तरुणांना मौल्यवान अनुभव मिळण्यास आणि त्यांच्यासाठी नवीन संधी खुल्या करण्यात मदत होत आहे.