फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागातील फॉरेन्सिक लॅबमध्ये वैज्ञानिक सहायक आणि सहायक रासायनिक विश्लेषक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. परंतु, या भरतीची लेखी परीक्षा थेट गुजरातमध्ये घेतली जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली आहे. १७ डिसेंबर २०२४ रोजीच्या शासन निर्णयानुसार कंत्राटी पद्धतीने ही भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वैज्ञानिक सहायक पदांसाठी फॉरेन्सिक अॅप्टीट्युड अँड कॅलिबर टेस्ट (FACT) परीक्षा घेण्यात येणार आहे, तर सहायक रासायनिक विश्लेषक पदांसाठी १६६ जागांची भरती प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे ही प्रक्रिया गुजरातमधील नॅशनल फॉरेन्सिक सायन्स युनिव्हर्सिटी (NFSU) मार्फत पार पडत आहे. उमेदवारांची निवड करण्यासाठी ५ आणि ७ एप्रिल रोजी लेखी परीक्षा घेतली जाणार आहे, परंतु महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी परीक्षा केंद्र गुजरातमधील गांधीनगर येथे निश्चित करण्यात आले आहे.
ही भरती महाराष्ट्रातील फॉरेन्सिक लॅबसाठी होत असली तरी परीक्षेसाठी राज्यात एकही परीक्षा केंद्र ठेवण्यात आलेले नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्रातून गुजरातला जाण्यासाठी थेट रेल्वे सुविधा नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रवासाचा खर्च सहन करावा लागणार आहे. शिवाय, राहण्याची व्यवस्था आणि इतर खर्चाचा भार देखील वाढणार आहे.
या अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांना परीक्षा देता येणार नाही, अशी शक्यता वर्तवली जात आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, जेव्हा ही भरती महाराष्ट्रासाठी आहे, तेव्हा परीक्षेची केंद्रेही राज्यात असली पाहिजेत. मुंबई आणि नागपूर येथे परीक्षा केंद्रे उपलब्ध करून दिल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी अनावश्यक प्रवास करावा लागणार नाही.
या प्रकारानंतर महाराष्ट्रातील फॉरेन्सिक सायन्सचे विद्यार्थी थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले आणि त्यांनी ही परीक्षा महाराष्ट्रातच घेण्याची मागणी केली. राज्यातील अनेक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी अर्ज दाखल केले आहेत. मात्र, त्यांना महाराष्ट्रात परीक्षा देता येणार नाही, ही मोठी अडचण आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रे मुंबई आणि नागपूर येथे निश्चित करण्यात यावीत, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. शासनाने या मागणीची तातडीने दखल घेऊन परीक्षा केंद्रांचा फेरविचार करावा, अशी विद्यार्थ्यांची अपेक्षा आहे.