
फोटो सौजन्य - Social Media
पालोद येथील सहकार महर्षी माणिकराव पालोदकर महाविद्यालयात कै. दादासाहेब पालोदकर स्मृतीप्रित्यर्थ सामान्यज्ञान स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा मोठा प्रतिसाद लाभला असून तब्बल ५००हून अधिक विद्यार्थ्यांनी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक अशा विविध गटांमध्ये सहभाग नोंदवला.
ग्रामीण भागातील विद्यार्थी बौद्धिकदृष्ट्या सक्षम व्हावेत, स्पर्धेच्या युगात आत्मविश्वासाने टिकून राहावेत तसेच स्पर्धा परीक्षांचे स्वरूप व प्रश्नपद्धती यांची ओळख शालेय जीवनातच व्हावी, या उद्देशाने महाविद्यालयाच्या वतीने ३१ डिसेंबर रोजी ही सामान्यज्ञान स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेली ही स्पर्धा एकूण १०० गुणांची होती. या स्पर्धेत सामान्यज्ञान, चालू घडामोडी, इतिहास, भूगोल, मराठी, इंग्रजी, बुद्धिमत्ता आणि गणित अशा विविध विषयांवरील प्रश्नांचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण ज्ञानाची व बौद्धिक क्षमतेची चाचणी घेण्यात आली. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक गटांमध्ये स्वतंत्रपणे ही स्पर्धा घेण्यात आल्याने सर्व स्तरांतील विद्यार्थ्यांना समान संधी मिळाली.
आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा झपाट्याने वाढत असून हे युग पूर्णपणे स्पर्धेचे युग आहे. अशा परिस्थितीत ग्रामीण भागातील विद्यार्थी मागे राहू नयेत, त्यांची स्पर्धा परीक्षांची पूर्वतयारी शालेय स्तरावरच व्हावी, या हेतूनेच या स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याचे प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य ज्ञानेश्वर काकडे यांनी केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि भविष्यातील विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांना दिशा मिळते, असेही त्यांनी नमूद केले. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेचे नियोजन कृष्णा पाटील, राजेश ठोंबरे, प्रदीप कानडजे, कृष्ण भांडारे, सुनील सागरे, प्रफुल्ल कळम, योगेश निंभोरे, राजाभाऊ भोसले, भास्कर केरले, गजानन सपकाळ, विक्की चांदुरकर, डॉ. रमेश काळे, संजय जाधव, जयश्री चापे, महादेवी ठवरे, संतुकराव मोरे आणि अक्षय निकम यांनी केले.
विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेत मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. प्रश्नपत्रिका अभ्यासपूर्ण व ज्ञानवर्धक असल्याचे मत अनेक विद्यार्थ्यांनी व्यक्त केले. अशा प्रकारच्या स्पर्धांमुळे अभ्यासाबरोबरच चालू घडामोडींची माहिती मिळते, तसेच स्पर्धात्मक दृष्टिकोन विकसित होतो, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे होते. महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे पालक, शिक्षक व शिक्षणप्रेमी नागरिकांकडून कौतुक करण्यात येत असून भविष्यातही अशा शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.