
फोटो सौजन्य - Social Media
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून यंदाच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम जाहीर करण्यात आला आहे. यंदा विशेष बाब म्हणून चौथी, पाचवी, सातवी आणि आठवी या चारही इयत्तांच्या विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. या परीक्षेचा अभ्यासक्रम कधी जाहीर होणार, याकडे शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. अखेर परिषदेने आपल्या अधिकृत संकेतस्थळावर अभ्यासक्रम उपलब्ध करून दिला आहे.
चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत एकूण चार विषयांचा समावेश असेल, गणित, बुद्धिमत्ता चाचणी, प्रथम भाषा आणि इंग्रजी (तृतीय भाषा). ही परीक्षा मराठी, उर्दू, इंग्रजी, हिंदी, गुजराती, तेलगू आणि कन्नड अशा सात माध्यमांतून घेण्यात येणार आहे.
चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी:
प्रथम भाषेत आकलन, शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व, कार्यात्मक व्याकरण आणि भाषाविषयक सामान्य ज्ञान विचारले जाणार आहे. गणितामध्ये संख्याज्ञान, संख्यांवरील क्रिया, अपूर्णांक, मापन, आकृतीबंध, भूमिती आणि चित्रालेख या घटकांचा समावेश आहे. इंग्रजी विषयात शब्दसंग्रह, विरामचिन्हे, संख्या माहिती, व्याकरण आणि चिकित्सक विचार यावर भर असेल. तर बुद्धिमत्ता चाचणीत तर्कसंगती, वर्गीकरण, सहसंबंध, आरशातील प्रतिमा आणि कूटप्रश्न या प्रकारचे प्रश्न विचारले जातील.
सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी:
प्रथम भाषा (मराठी) विषयात आकलन, शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व, कार्यात्मक व्याकरण आणि पहिली ते सातवीच्या मराठी विषयांशी संबंधित सामान्य ज्ञान विचारले जाणार आहे. गणितात संख्याज्ञान, संख्यांवरील क्रिया, भूमिती, मापन, सांख्यिकी, व्यावहारिक गणित आणि बीजगणित या घटकांचा समावेश आहे. इंग्रजी तृतीय भाषेत शब्दसंपदा, व्याकरण, सर्जनशील लेखन, वाचन कौशल्य, शब्दकोडी आणि भाषा अभ्यास यांचा अभ्यासक्रमात समावेश आहे.
याशिवाय बुद्धिमत्ता चाचणीत तर्कसंगती, अनुमान, जलप्रतिबिंब, आकृतीचे पृथःकरण, मनोरे आणि सांकेतिक भाषा यांसारख्या घटकांवर आधारित प्रश्न विचारले जाणार आहेत. राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा शैक्षणिक प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार असून, त्यांच्या बौद्धिक क्षमतेला नवे वळण देणारी ठरेल.