फोटो सौजन्य - Social Media
IAS आर्मस्ट्राँग पाम यांची यशोगाथा UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक दीपस्तंभ आहे. मणिपूरच्या दुर्गम भागातील एका छोट्या आदिवासी गावात जन्मलेले आर्मस्ट्राँग पाम हे जेमे नागा जमातीचे पहिले IAS अधिकारी ठरले. अत्यंत साध्या कुटुंबात वाढलेले आर्मस्ट्राँग यांनी सुरुवातीचे शिक्षण मणिपूरमध्येच पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी शिलाँग येथील सेंट एडमंड्स कॉलेजमधून बारावी केली आणि दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून फिजिक्समध्ये पदवी मिळवली. पदवी पूर्ण होताच त्यांनी UPSC परीक्षेची तयारी सुरू केली. 2007 मध्ये पहिल्याच प्रयत्नात त्यांनी भारतीय महसूल सेवा (IRS) मध्ये स्थान मिळवलं. मात्र, त्यांचं खऱ्या अर्थाने स्वप्न होतं IAS बनण्याचं. त्यामुळे त्यांनी दुसऱ्यांदा परीक्षेला बसण्याचा निर्णय घेतला. 2008 मध्ये केवळ २४ व्या वर्षी त्यांनी दुसऱ्याच प्रयत्नात UPSC यशस्वीरीत्या पार करून IAS होण्याचं स्वप्न साकार केलं.
आर्मस्ट्राँग पाम यांना ‘मिरॅकल मॅन’ अर्थात ‘चमत्कारिक व्यक्ती’ म्हणून ओळखलं जातं, आणि त्यामागे एक अत्यंत प्रेरणादायी कारण आहे. भारताच्या उत्तर-पूर्वेकडील भागातील तमेंगलोंग जिल्ह्यात उपविभागीय अधिकारी म्हणून कार्यरत असताना, त्यांनी एक असं कार्य केलं, जे केवळ प्रशासकीय दृष्टिकोनातून नव्हे, तर मानवी दृष्टीनेही अद्वितीय आणि ऐतिहासिक ठरलं. या भागातील गावांमध्ये पायाभूत सुविधांची कमतरता होती, रस्ते नसल्यामुळे लोक दैनंदिन गरजांसाठीदेखील अडचणीत सापडत होते. पावसाळ्यात रुग्णांना रुग्णालयात पोहोचवणं, विद्यार्थ्यांना शाळेत जाणं, कीव्वा शेतमालाची वाहतूक करणं हे सर्वच अत्यंत कठीण बनलं होतं.
आर्मस्ट्राँग पाम यांनी कोणतीही सरकारी मदत न घेता, जवळपास एक वर्षाच्या अथक परिश्रमानंतर तब्बल 100 किमी लांबीचा रस्ता बांधला गेला, जो मणिपूर, नागालँड आणि आसाम या तीन राज्यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरला. या रस्त्याला “पीपल्स रोड” असं नाव देण्यात आलं कारण तो लोकांच्या श्रमातून साकार झाला होता.
त्यांचं नेतृत्व, दूरदृष्टी, चिकाटी आणि समाजासाठी काहीतरी करण्याची जाणीव ही आजच्या तरुण पिढीसाठी एक प्रेरणास्त्रोत आहे. त्यांनी आपला अधिकार एक बडेजाव म्हणून न वापरता, सेवा म्हणून स्वीकारला. ते केवळ यशस्वी IAS अधिकारी नाहीत, तर जनतेचे खरेखुरे सेवक आहेत. त्यांच्या कार्यशैलीत नम्रता, सहवेदना आणि उत्तरदायित्वाचे दर्शन घडते. आर्मस्ट्राँग पाम यांची कथा हे सिद्ध करते की संकट कितीही मोठं असलं, तरी दृढ निश्चय, मेहनत, सकारात्मक दृष्टीकोन आणि सामाजिक बांधिलकी असेल, तर कोणतीही गोष्ट अशक्य नसते. या एका रस्त्याच्या माध्यमातून त्यांनी शेकडो गावांना जोडलं, हजारो लोकांचे जीवन सुलभ केलं आणि संपूर्ण देशासमोर एका आदर्श प्रशासकाचं उदाहरण उभं केलं. म्हणूनच आजही त्यांना प्रेमाने आणि आदराने ‘मिरॅकल मॅन’ म्हणून संबोधलं जातं.