फोटो सौैजन्य - Social Media
संघ लोकसेवा आयोग (UPSC) ही देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेची परीक्षा मानली जाते. लाखो विद्यार्थी दरवर्षी या परीक्षेत सहभागी होतात, पण त्यातील फारच थोडे जण अंतिम यश मिळवतात. त्यासाठी कठोर मेहनत, सातत्य, समर्पण आणि आत्मविश्वास आवश्यक असतो. आज आपण एका अशाच जिद्दी आणि प्रेरणादायी तरुणाची गोष्ट पाहणार आहोत. ही कथा आहे IAS अधिकारी हिमांशू गुप्ता यांची, ज्यांनी केवळ प्रतिकूल परिस्थितींवर मातच केली नाही, तर सलग तीन प्रयत्नांमध्ये UPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन IAS बनण्याचे स्वप्नही पूर्ण केले.
हिमांशू गुप्ता यांचा जन्म उत्तराखंडमधील उधमसिंह नगर जिल्ह्यातील सितारगंज या लहान गावात झाला. त्यांचे बालपण उत्तर प्रदेशातील बरेली जिल्ह्यातील सिरौली या छोट्याशा गावात गेले. त्यांचे वडील रस्त्याच्या कडेला असलेल्या एका टपरीवर चहा विकत असत आणि घराची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची होती. हिमांशू शालेय जीवनात अभ्यासू होते, पण त्यांना दररोज 70 किलोमीटरचा प्रवास करून शाळेत जावे लागायचे. घरची परिस्थिती पाहून ते आपल्या वडिलांना चहा विकण्याच्या कामात मदतही करत होते. एक वेळ अशी आली की त्यांनी आर्थिक भार उचलण्यासाठी ट्युशन घेण्यासही सुरुवात केली.
शालेय शिक्षणानंतर हिमांशू दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमध्ये दाखल झाले आणि त्यांनी बॉटनी (वनस्पतीशास्त्र) विषयात B.Sc ची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी भारतातील एक नामांकित शिक्षणसंस्था, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU), येथून पब्लिक अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. शिक्षणासोबतच घरच्यांची आर्थिक जबाबदारी असल्याने त्यांनी एका सरकारी महाविद्यालयात रिसर्च स्कॉलर म्हणून नोकरी स्वीकारली. याच दरम्यान त्यांनी UPSC सिव्हिल सेवा परीक्षेची तयारी सुरू केली, तीही कोणतीही कोचिंग न घेता, केवळ स्वअभ्यासाच्या जोरावर. 2018 मध्ये त्यांनी पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली आणि त्या प्रयत्नातच त्यांची भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (IRTS) मध्ये निवड झाली. परंतु त्यांचे अंतिम ध्येय IAS बनणे हेच होते, म्हणून त्यांनी अभ्यास सुरूच ठेवला.
2019 मध्ये दुसऱ्या प्रयत्नात त्यांनी देशभरातून 309 वी रँक मिळवली आणि त्यांची निवड IPS (भारतीय पोलीस सेवा) मध्ये झाली. तरीही त्यांनी समाधान न मानता IAS साठी प्रयत्न सुरू ठेवला. अखेर, 2020 मध्ये त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले. UPSC CSE मध्ये AIR 139 मिळवून भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. हिमांशू गुप्ता यांची ही यशोगाथा लाखो विद्यार्थ्यांना प्रेरणा देते. अत्यंत कठीण परिस्थितीत, आर्थिक चणचण, शिक्षणाच्या अडचणी, संसाधनांचा अभाव असूनही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी दाखवून दिले की जर मनापासून काहीतरी ठरवले, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. मेहनत, चिकाटी आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणत्याही कठीण स्वप्नाची पूर्तता करता येते.