
फोटो सौजन्य - Social Media
मुंबईत आयोजित स्वाक्षरी समारंभात टाटा ट्रस्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सिद्धार्थ शर्मा, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. (डॉ.) रविंद्र डी. कुलकर्णी, तसेच संवर्धन वास्तुशास्त्र क्षेत्रातील तज्ज्ञ संस्था ‘आभा नरेन लांबा असोसिएट्स’ यांच्या प्रिन्सिपल आर्किटेक्ट आभा नरेन लांबा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
१८५७ मध्ये स्थापन झालेल्या मुंबई विद्यापीठाचा फोर्ट कॅम्पस हा देशातील सर्वात जुना आणि प्रतिष्ठित शैक्षणिक परिसर मानला जातो. राजाबाई क्लॉक टॉवर, विद्यापीठाची भव्य ग्रंथालय इत्यादी वास्तूंसह सर कावसजी जहांगीर कॉन्वोकेशन हॉलही या जागतिक कीर्तीच्या नियो-गोथिक वारशाचा भाग आहे. १८७४ मध्ये सर कावसजी जहांगीर यांच्या उदार देणगीतून ही वास्तू पूर्ण झाली असून, ती दीर्घकाळापासून शैक्षणिक परंपरा, नागरी अभिमान आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक राहिली आहे.
२००६ मध्ये महाराष्ट्र सरकार, जमशेदजी टाटा ट्रस्ट आणि मुंबई मेट्रोपॉलिटन रीजन हेरिटेज कन्झर्वेशन सोसायटी यांच्या सहकार्याने या सभागृहाचा मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार करण्यात आला होता. आभा नरेन लांबा असोसिएट्सने उभारलेल्या त्या प्रकल्पाला युनेस्को एशिया-पॅसिफिक हेरिटेज अवॉर्ड फॉर डिस्टिंक्शन हा आंतरराष्ट्रीय सन्मान मिळाला होता.
या नव्या MoU प्रसंगी बोलताना टाटा ट्रस्ट्सचे सीईओ सिद्धार्थ शर्मा म्हणाले, “टाटा ट्रस्ट्सने स्थापनेपासून सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट संस्थांना बळ दिले आहे. सर कावसजी जहांगीर कॉन्वोकेशन हॉलचे संवर्धन हे फक्त एका वास्तूचे पुनरुज्जीवन नसून, मुंबईच्या शैक्षणिक वारशाचा सन्मान करण्याचे प्रतीक आहे. आम्हाला आनंद आहे की ही वास्तू तिच्या ऐतिहासिक भव्यतेसह आधुनिक विद्यापीठाच्या गरजांनुसार विकसित होणार आहे.”
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रो. (डॉ.) रविंद्र डी. कुलकर्णी म्हणाले, “या वास्तूच्या पुनरुज्जीवनासाठी टाटा ट्रस्ट्सने दिलेला हातभार अमूल्य आहे. या सहयोगामुळे कॉन्वोकेशन हॉल भविष्यातही विद्यार्थी, संशोधक, नागरिक आणि पर्यटकांना आकर्षित करणारा, प्रेरणा देणारा वारसा-चिन्ह म्हणून उभा राहील.” प्रकल्पाचे नेतृत्व करणार्या श्रीमती आभा नरेन लांबा म्हणाल्या, “२० वर्षांपूर्वी या नियो-गोथिक वास्तूचे पुनरुज्जीवन करण्याचा सन्मान आम्हाला मिळाला होता. पुन्हा एकदा या ऐतिहासिक रत्नावर काम करणे ही गौरवाची गोष्ट आहे. टाटा ट्रस्ट्सने २००६ मध्येही भरीव मदत केली होती आणि आता पुन्हा एकदा तेच योगदान देत आहेत.”
या प्रकल्पात मूळ वास्तुकलेचे सर्वात उत्कृष्ट घटक कायम ठेवून, आधुनिक पायाभूत सुविधा समाकलित केल्या जातील. शैक्षणिक उपक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आणि महत्त्वाच्या विद्यापीठीय कार्यक्रमांसाठी ही जागा अधिक उपयुक्त बनवण्यावर भर दिला जाणार आहे.
टाटा ट्रस्ट्स आणि मुंबई विद्यापीठ यांच्या या संयुक्त प्रयत्नामुळे कॉन्वोकेशन हॉलचे ऐतिहासिक महत्त्व अधिक दृढ होणार असून, शहराच्या सांस्कृतिक ओळखीला नवी ऊर्जा मिळणार आहे. हा उपक्रम मुंबईच्या वारशाचे संवर्धन आणि भविष्यातील पिढ्यांसाठी त्याचा सन्मान राखण्याची दिशा दाखवणारा ठरणार आहे.