
फोटो सौजन्य - Social Media
राष्ट्रीय छात्र सेना (NCC) दिनानिमित्त कोहिनूर समूह संचलित प्रीमियर शिक्षण मंडळाच्या गांधी बालमंदिर हायस्कूल, कुलां येथे देशभक्तीपर वातावरणात विविध कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध संचलन, साहसी प्रात्यक्षिके आणि सांस्कृतिक सादरीकरणांच्या माध्यमातून राष्ट्रप्रेमाचा जागर घातला. शाळेचे मुख्याध्यापक अनिल पांचाळ, पर्यवेक्षक रवींद्र खोंडे आणि एनसीसी ऑफिसर विश्वनाथ पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. यावेळी मेजर मनोज भामरे तसेच शाळेचे माजी एनसीसी ऑफिसर सुरेश कावडे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते एनसीसी ध्वजारोहणाने झाली. त्यानंतर एनसीसी, स्काऊट-गाईड, आरएसपी आणि बँड पथकातील विद्यार्थ्यांनी दिमाखदार संचलन करत एनसीसी ध्वजास मानवंदना दिली. शिस्त, आत्मविश्वास आणि राष्ट्रनिष्ठेचे दर्शन घडवणारे हे संचलन उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. यानंतर विद्यार्थ्यांनी विविध साहसी आणि प्रात्यक्षिक कार्यक्रम सादर केले. रायफल ड्रिल, ऑपरेशन सिंदूर, बोनेट फायटिंग डेमो, सेक्शन अटॅक यांसारख्या सादरीकरणांनी कार्यक्रमात थरार निर्माण केला. तसेच देशभक्तीवर आधारित नृत्य, लेझिम सादरीकरणाने प्रेक्षकांमध्ये उत्साह संचारला.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले लोकजागरण प्रतिष्ठानचे प्रशिक्षक मंगेश केणी, क्षितिज केणी आणि विराज तांडेल यांनी सादर केलेली शिकलिनी तलवारबाजी, दांडपट्टा आणि लाठीकाठीची थरारक प्रात्यक्षिके. पारंपरिक युद्धकलेचे हे सादरीकरण विद्यार्थ्यांसह उपस्थित पालकांनाही भारावून गेले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी रत्नकांत विचारे, अवधूत चव्हाण, अमोल जागले आणि घनश्याम जोशी यांनी विशेष सहकार्य केले. छात्र सेनेच्या लालबद्ध संचलनासह भरगच्च कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक, पालक आणि माजी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते उत्कृष्ट छत्रसैनिक तसेच क्रीडा सप्ताहातील विजेत्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्रे प्रदान करून गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वाचे कौतुक करताना मान्यवरांनी एनसीसीमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि देशभक्तीची भावना रुजते, असे मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे पर्यवेक्षक रवींद्र खोंडे यांनी उपस्थितांचे आभार मानले. सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका अर्चना जाचय यांनी केले, तर बक्षीस वाचन अर्चना सातपुते यांनी केले. राष्ट्रीय छात्र सेना गीताने या देशभक्तीपूर्ण सोहळ्याची भावपूर्ण सांगता करण्यात आली.