फोटो सौजन्य - Social Media
बुधवारी सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. मुंबईहून बारामतीकडे जात असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या भीषण अपघातात अजित पवार यांच्यासह अन्य सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली असून, राज्यभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. सर्व पक्षीय नेत्यांनी पवार कुटुंबियांचे भावूक शब्दांत सांत्वन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते आणि मान्यवर बारामतीकडे रवाना झाले आहेत. अजित पवार यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने बारामतीत दाखल होत आहेत.
अजित पवार यांचे अंत्यविधी गुरुवारी सकाळी बारामती येथे होणार असून, सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अग्निसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या अंत्यविधीसाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
दरम्यान, अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्र शासनाने राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. अधिकृत शासन निर्णयानुसार २८ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यभर शासकीय दुखवटा पाळण्यात येणार आहे. या कालावधीत सर्व शासकीय इमारतींवर राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर फडकवण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज्यात शासकीय सुट्टी जाहीर केली होती. त्यानुसार ३० जानेवारीपर्यंत राज्यातील सर्व शासकीय तसेच खासगी शाळा बंद राहणार आहेत. याचबरोबर या कालावधीत कोणतेही शासकीय कार्यक्रम, समारंभ, उत्सव किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित करण्यास सक्तीने बंदी घालण्यात आली आहे.
शासनाने दिलेल्या निर्देशानुसार तीन दिवसांच्या दुखवट्याच्या काळात कोणत्याही प्रकारचा जल्लोष, सांस्कृतिक कार्यक्रम किंवा सार्वजनिक उत्सव होणार नाहीत. तसेच राज्यातील सर्व शासकीय कार्यालये या कालावधीत बंद राहणार आहेत.
अजित पवार यांच्या निधनामुळे महाराष्ट्राने एक अनुभवी आणि प्रभावी नेता गमावला असून, त्यांच्या कार्याचा ठसा राज्याच्या राजकारणावर दीर्घकाळ राहणार आहे. राज्य शासनाने नागरिकांना शांतता राखण्याचे आणि शासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.






