फोटो सौजन्य - Social Media
देशातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या संघ लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत यश मिळवणं ही एक मोठी कामगिरी मानली जाते. अनेक विद्यार्थ्यांना ही परीक्षा पार करण्यासाठी अनेक वर्षं मेहनत घ्यावी लागते. अशात जर एका कुटुंबातून एक जणसुद्धा UPSC क्रॅक करतो, तर ती मोठी कौटुंबिक यशोगाथा ठरते. मात्र उत्तर प्रदेशातील एका कुटुंबाने चारही अपत्यांनी UPSC परीक्षेत यश मिळवत एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
उत्तर प्रदेशातील लालगंज येथील अनिल प्रकाश मिश्रा हे ग्रामीण बँकेत व्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. साधेसे कुटुंब, मध्यमवर्गीय पार्श्वभूमी आणि मर्यादित उत्पन्न असूनही त्यांनी आपल्या चारही मुलांना उच्च शिक्षण दिले. शिक्षणात कधीच कसूर केली नाही. त्यांच्या त्यागाचे फळ म्हणजे आज त्यांच्या चारही मुलांनी UPSC परीक्षा यशस्वीरीत्या पार केली आहे.
सर्वात मोठे सुपुत्र योगेश मिश्रा यांनी २०१३ मध्ये आपल्या पहिल्याच प्रयत्नात UPSC परीक्षा उत्तीर्ण केली आणि IAS अधिकारी बनले. त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांच्या बहिणीनेही UPSC चा मार्ग निवडला. क्षमा मिश्रा, ज्या पहिल्या तीन प्रयत्नांमध्ये अपयशी ठरल्या, पण चौथ्या प्रयत्नात त्यांनी घवघवीत यश मिळवले आणि IPS अधिकारी बनल्या.
माधुरी मिश्रा, योगेश यांची दुसरी बहीण, हिनेही २०१४ मध्ये आपल्या पहिल्याच प्रयत्नात UPSC क्रॅक केले आणि IAS अधिकारी बनली. यानंतर सर्वात लहान भाऊ लोकेश मिश्रा यांनी २०१५ मध्ये UPSC चा पहिलाच अटेंप्ट दिला आणि थेट AIR 44 मिळवून IPS झाले. ही चारही भावंडं आज देशाच्या सेवा क्षेत्रात प्रतिष्ठेने कार्यरत आहेत. त्यांच्या कष्टाची आणि पालकांच्या त्यागाची ही यशोगाथा लाखो विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं हीच खरी भक्ती आहे, हे या चौघांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिलं आहे. संघर्ष, सातत्य आणि योग्य मार्गदर्शन असलं, तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही, हे या कुटुंबाने सिद्ध केलं आहे.