फोटो सौजन्य - Social Media
पोलादपूर तालुक्यातील मोरसडे, देवळे, साखर, दिविल, मोरगिरी, चोळई आदी गावांतील विविध शाळांमध्ये कदम कृष्णा वैद्यकीय मदत कक्ष यांच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. कांगोरीगड माध्यमिक विद्यालय मोरसडे, नरवीर तानाजी मालुसरे विद्यालय देवळे, माध्यमिक विद्यालय साखर, प्राथमिक शाळा दिविल व मोरगिरी आदी ठिकाणी हा उपक्रम राबवण्यात आला.
या कार्यक्रमात वैद्यकीय मदत कक्षाचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा कदम, सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष चंद्रकांत मोरे, आपली माती आपली माणसं संघटनेचे अध्यक्ष निलेश कोळसकर, ओंबळी विद्यालयाचे शिक्षक दीपक सकपाळ, भरत चोरगे, शुभांगी महाडिक, संदीप जाबडे, अनिल मोरे, कृष्णा सणस, दत्ता केसरकर, प्रमोद उतेकर व प्रविण महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शुभांगी महाडिक यांनी विद्यार्थ्यांना कोकण टॅलेंट्स सर्चच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांकडे वळण्याचे आवाहन करत, UPSC आणि MPSC सारख्या परीक्षांमध्ये उतरून अधिकाऱ्यांचे स्वप्न साकार करा, असे सांगितले. चंद्रकांत मोरे यांनी विद्यार्थ्यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश आठवून देत चांगले शिक्षण घेण्याचे महत्त्व पटवून दिले. दीपक सकपाळ यांनी विद्यार्थ्यांना मोठे झाल्यावर आपल्या भावंडांना मदत करावी, शिक्षणासाठी प्रेरणा द्यावी असा संदेश दिला. कार्यक्रमात प्रमोद उतेकर यांचे कार्यही गौरविण्यात आले.
या प्रसंगी बोलताना कृष्णा कदम यांनी आपल्या भावनिक शब्दांत सांगितले की, “मी कोणावर उपकार करत नाही, ही माझी जबाबदारी आहे. माझ्या ‘वैद्यकीय मदत कक्ष’ या ग्रुपमधील 1300 जणांचे हे सामूहिक श्रेय आहे. माझं स्वप्न आहे की, माझ्या पोलादपूर तालुक्यात सुसज्ज हॉस्पिटल उभे राहावे आणि त्यामध्ये काम करणारे कर्मचारीही याच तालुक्यातील असावेत.” हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणारा असून समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारा आहे.