
फोटो सौजन्य - Social Media
डिसेंबरमध्ये क्लासेस सुरू होतील अशी अपेक्षा होती, मात्र सध्या हँगरचं बांधकाम अद्याप सुरू झालेलं नाही. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून (DGCA) हँगरच्या उंचीबाबतची मंजुरी मिळालेली नाही. तसेच माती परीक्षण, जिओ टॅगिंग आणि इतर प्रशासकीय प्रक्रिया सुरू आहेत. त्यामुळे प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी अजून काही महिने प्रतीक्षा करावी लागेल. या सगळ्या कामाच्या रखडणीमुळे याचा परिणाम ट्रेनिंगवर झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना तसेच इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना थोडी वाट पाहावी लागणार आहे आणि विलंब झाला आहे.
या प्रशिक्षण केंद्रामुळे मराठवाड्यात प्रथमच पायलट ट्रेनिंग उपलब्ध होणार आहे. यापूर्वी विद्यार्थ्यांना बारामती, धुळे किंवा जळगाव येथे प्रशिक्षणासाठी जावे लागत होते. स्थानिक उद्योजकांच्या प्रयत्नांमुळे हे स्वप्न आता वास्तवात उतरू लागले आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाने विमानतळाच्या आवारातील जागा या संस्थेला उपलब्ध करून दिली आहे. मराठवाड्यातील उमेदवारांसाठी हे ट्रेनिंग सेंटर फार महत्वाचे आणि किफायतशीर ठरणार आहे.
दरम्यान, कॅप्टन, पायलट ट्रेनर्स, टेक्निकल इंजिनिअर्स अशा २५ ते ३० प्रशिक्षकांच्या नियुक्तीसाठी मुलाखती सुरू झाल्या आहेत. ‘हँगर’मध्ये स्टिम्युलेटर कॅबिन बसवली जाणार असून, विद्यार्थ्यांना त्यावरून प्रत्यक्ष फ्लाईट अनुभवासारखं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. सर्व परवानग्या आणि बांधकाम पूर्ण झाल्यानंतर हे ट्रेनिंग इन्स्टिट्यूट पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल. त्यामुळे पायलट होण्याचं स्वप्न पाहणाऱ्या मराठवाड्यातील तरुण-तरुणींना आता स्वतःच्या शहरातच प्रशिक्षणाची सुवर्णसंधी मिळणार आहे. या ट्रेनिंग सेंटरमुळे स्थानिक पातळीवर अनेक रोजगाराच्या संध्या उपलब्ध झाल्या आहेत. प्रशिक्षक असो वा इतर कर्मचारी या पदांसाठी मराठवाड्यातील स्थानिकांना नियुक्त करण्यात येत आहेत.