धनगर आरक्षणासाठी एकाची आत्महत्या
फुलंब्री : तालुक्यातील खामगाव गोरक्षनाथ येथील एका ३८ वर्षीय व्यक्तीने धनगर समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. त्याचा मृतदेह शविच्छेदनासाठी फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.
गोपीनाथ रघुनाथ दागोडे असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. खामगाव गोरक्षनाथ येथील गोपीनाथ दागोडे हा आपल्या मुलांसबोत शेतातच राहत होता. मात्र, रोजच्या प्रमाणे बुधवारी सकाळी तो उठला व घरातून बाहेर निघून गेला. नंतर त्याने लिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घरी परत न आल्याने त्यांना पाहण्यासाठी गेले असता त्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत दिसून आला. त्याच्या जवळच त्याने धनगर समाजाला आरक्षण मिळावे माझे बलिदान व्यर्थ ठरणार नाही, असे चिट्ठीत लिहून ठेवले होते.
त्यानंतर वडोद बाजार पोलिसांना याबाबत माहिती दिली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर चव्हाण यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन फुलंब्री येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. मात्र, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत गोपीनाथच्या पश्चात पत्नी, चार मुली असा मोठा परिवार आहे.
कर्जाच्या चिंतेने शेतकऱ्याची आत्महत्या
दुसऱ्या एका घटनेत, बुलडाण्याच्या चिखली तालुक्यातील गुंजाळा येथील संतोष शंकर केदार (वय २१) या शेतकरी तरुणाने लिंबाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी (दि. २६) घडली. सततची अतिवृष्टी, पिकांचे नुकसान आणि महाराष्ट्र बँकेचे कर्जाचे ओझे यामुळे निर्माण झालेल्या नैराश्येतून हे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती दिली जात आहे.