अंबरनाथमधील एका टर्फ चालकाला मारहाण आणि शिवीगाळ करणं पोलीस उपनिरीक्षकाला चांगलंच भोवलं आहे. नियमानुसार कारवाई करण्याऐवजी दबंगगिरी दाखवणं पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगलट आलं आहे. याप्रकरणात तक्रारदार यांना नुकसानभरपाई म्हणून पाच लाख रुपये देण्याचे आदेश राज्य मानवी हक्क आयोगाने दिले आहेत. तर या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी, की डोंबिवलीत राहणारे केवल विकमणी हे अंबरनाथ पूर्वेच्या चिखलोली परीसरात टर्फ चालवत होते. 20 मे 2023 रोजी मध्यरात्री विकमनी यांच्या टर्फ मध्ये क्रिकेटचे सामने सुरू होते. यादरम्यान अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील हे पोलीस वाहनाने आपल्या सहकाऱ्यांसह टर्फजवळ आले तेव्हा त्यांना मध्यरात्री क्रिकेटचे सामने सुरू असल्याच निदर्शनास आलं. मात्र यावेळी पोलीस उप निरीक्षक सुहास पाटील यांनी टर्फ चालकावर नियमानुसार कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित होत मात्र यावेळी पाटील यांनी दबंगगिरी दाखवत टर्फ चालक केवल विकमनी यांना कानशिलात लगावली तसेच अर्वाच्य शिवीगाळ करून खेळाडूंना देखील मारहाण केली. तसेच सुहास पाटील यांनी इतक्यावरच न थांबता खेळाडूंना २०० उठाबशा काढण्यास देखील भाग पाडले.
पोलीस उपनिरीक्षकाची ही दबंगगिरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणी विकमानी यांनी राज्य मानवी हक्क आयोगाकडे वकील गणेश घोलप यांच्या मार्फत तक्रार दाखल केली होती. राज्य मानवी हक्क आयोगाने पोलीस उप निरीक्षक सुहास पाटील यांच्या वर्तनाबाबतचे आक्षेप आणि तपशील यांचा सखोल आढावा घेऊन पाटील यांनी पदाचा गैरवापर करून मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत सुहास पाटील यांना दणका दिला आहे. राज्य मानवी हक्क आयोगाने निकाल देताना पोलीस उपनिरीक्षक सुहास पाटील यांनी तक्रारदार केवल विकमणी यांना सहा आठवड्यांच्या आत पाच लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच पोलीस कर्मचारी यांचे नागरिकांशी वर्तन सुधारण्यासाठी प्रत्येक महिन्यात सेमिनार आयोजित करून नागरिकांशी सौजन्याने वागण्या संबंधित निर्देश दिले आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा नोंदवुन खातेनिहाय चौकशी करण्यासंदर्भात देखील निर्देश दिले आहेत.
तर या प्रकरणी उल्हासनगर परिमंडळ ४ चे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांना विचारले असता, संबंधित अधिकाऱ्यावर राज्य मानवी हक्क आयोगाने केलेली कारवाई योग्य असून अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी सर्व पोलीस कर्मचारी अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच या प्रकरणी पुढील कारवाई करण्यासाठी अंबरनाथ सहायक पोलीस आयुक्त यांना आदेश देण्यात आले आहेत. अशी प्रतिक्रिया पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.