संग्रहित फोटो
सासवड : मद्यधुंद अवस्थेतील कार चालकाने समोरून येणाऱ्या दोन दुचाकीना जोरदार धडक दिली आहे. या भीषण अपघातात एका दुचाकीवरील दोघांचा जागीच मूत्यू झाला आहे. तर दुसऱ्या एका दुचाकीवरील एका महिलेसह दोघे गंभीर जखमी असून, त्यांच्यावर सासवड येथील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
रविंद्र गोपाळ काकडे (वय ६५) आणि महेद्र संपत काकडे( वय ५३, दोघेही रा. पांगारे ता. पुरंदर) अशी अपघात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे आहेत. तर तुकाराम जयवंत पोमण (वय ६०) आणि सुरेखा तुकाराम पोमण (वय ५०, दोघेही रा. पिंपळे, ता. पुरंदर) हे पती पत्नी गंभीर जखमी आहेत. याप्रकरणी कारचालक अक्षय सुहास परख ( वय ३०, रा. अँमेनोरा हडपसर पुणे. मुळ रा. नेहापुजा कोऑपरेटीव्ह सोसायटी मिटानगर, गोरेगाव वेस्ट मुबई) याला पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रकाश राजाराम काकडे (वय ४०, रा पांगारे) यांनी सासवड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी प्रकाश काकडे हे सासवडकडे जात असताना कार (क्र एम.एच ४७ सीडी. ७७०८) भरधाव वेगात येवून ओव्हरटेक करून पुढे गेली. काही अंतर पुढे गेल्यावर काळुबाई मंदीराजवळील कॉर्नरवर सासवड बाजूकडून पांगारेकडे येणारी दुचाकी ( क्र. एमएच १२ सीएफ. २७८८) या गाडीला कारने जोरदार धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील रविंद्र काकडे आणि महेद्र काकडे रस्त्यावर फेकले गेले. त्यांना गंभीर दुखापत होवून जोरदार रक्तस्त्राव झाला. त्यानंतर पुन्हा दुसरी दुचाकी (क्र.एम.एच. १२ एचक्यू १८०९ ) या गाडीलाही जोरदार धडक दिली. यात दुचाकीवरील तुकाराम पोमण आणि सुरेखा पोमण हे पती-पत्नी गंभीर जखमी झाले.
जखमींवीर उपचार सुरु
दरम्यान, तातडीने रुग्वाहिका बोलावून सर्व जखमींना सासवड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र यातील रविंद्र काकडे आणि महेद्र काकडे या दोघांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर इतर दोघा जखमींवर सासवडला खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक परमेश्वर गोडसे करीत आहेत.
हे सुद्धा वाचा : मोठा अपघात टळला! दिल्ली विमानतळावर दोन विमानांची टक्कर, सर्व प्रवासी सुरक्षित






