पुणे : कल्याणीनगर चौकात सात महिन्यांपूर्वी दुचाकीवरील सहप्रवासी तरुणाला चिरडून पसार झालेल्या ट्रकचालकाला अटक करण्यात येरवडा पोलिसांना यश आले आहे. अपघातानंतर पसार झालेल्या ट्रकचालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी १०० ठिकाणचे सीसीटीव्ही तपासले. ट्रकच्या मालकाचा शोध घेऊन चालकाला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने कबूली दिली. मोहंमद अशीम हातीम अन्सारी (वय ३४, रा. कुन्हार कला, जि. हजारीबाग, झारखंड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक रवींद्रकुमार शेळके, गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर व त्यांच्या पथकाने केली आहे.
कल्याणीनगर भागात २० जानेवारी रोजी एक भरधाव ट्रकने दुचाकीला पाठीमागून धडक दिली होती. या अपघातात दुचाकी चालक गौरव खंडारे गंभीर जखमी झाला होता. गौरवबरोबर असलेला सहप्रवासी मित्र इशान सुनील करवडे (वय ३४) हा या अपघातात ट्रकच्या चाकाखाली सापडला होता. ट्रकचालक अन्सारीने ट्रक थांबविला नाही. ट्रकच्या चाकाखाली इशान चिरडला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला होता. याप्रकरणी येरवडा पोलिसांत अज्ञात ट्रक चालकाविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
अपघातानंतर येरवडा पोलिसांनी तपास सुरू केला. पसार झालेल्या ट्रकचालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस कर्मचारी अनिल शिंदे यांनी जवळपास शंभर ठिकाणचे सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. ट्रकवरील वाहन क्रमांकाची पाटी दिसली. त्यानंतर पोलिसांनी ट्रकमालकाचा शोध घेतला. अपघात घडला तेव्हा ट्रकवर अन्सारी चालक असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी अन्सारीला पकडले.