माजी आमदाराला लैंगिक अत्याचाराच्या आरोपाखाली अटक, राजकीय वर्तुळात खळबळ (फोटो सौजन्य-X)
गिरीश रासकर, अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर मतदारसंघांमधील माजी आमदारावर एका महिलेने अत्याचाराचा गुन्हा दाखल केलेला आहे. त्यानुसार राहुरी पोलिसांनी त्यांना राहत्या घरातून रात्री अटक केली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
श्रीरामपूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्यावर राहुरी पोलिस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल झालेला आहे. राहुरी तालुक्यातील एका गावातील महिलेने अत्याचार प्रकरणी सोमवारी संध्याकाळी फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर पोलिस या घटनेचा तपास करत होते. मुरकुटे हे कामानिमित्त जिल्ह्याबाहेर होते. मुरकुटे रात्री साडेअकराच्या सुमारास घरी परतल्याचे समजताच राहुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संजय ठेंगे यांनी त्यांच्या घरी जावून चौकशी करून त्यांना निवासस्थानावरून अटक केली. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेचा पोलिसांनी सखोल तपास करून सत्य बाहेर आणावे अशी मागणी जनतेतून होत आहे.
दरम्यान माजी आमदार मुरकुटे यांना अटक केल्यानंतर रात्री त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना नगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.सध्या त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असल्याचे समजते. मुरकुटे यांना नेमका कोणता त्रास झाला याबाबत कुठलीही अधिकृत माहिती मिळाली नाही.
माजी आमदार भानुदास मुरकुटे यांचा श्रीरामपूर तालुक्यासह जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोठा दबदबा असून 80 च्या दशकापासून मुरकुटे यांचे जिल्ह्याच्या राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका राहिलेली आहे. माजी आमदार भानुदास मुरकुटे हे तीन वेळा श्रीरामपूर मतदारसंघातून विधानसभेवर निवडून गेले आहेत. सध्या ते अशोक सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक म्हणून कार्यरत आहेत. मुरकुटे यांनी अलीकडेच भारत राष्ट्र समिती पक्षामध्ये प्रवेश केला होता. यापूर्वी त्यांनी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील काम केले आहे. आक्रमक कार्य शैलीमुळे श्रीरामपूर तालुक्यासह जिल्ह्यात सर्वांच्या परिचित होते. श्रीरामपूरच्या पाणी प्रश्नावर त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले होते.