संग्रहित फोटो
वडगाव मावळ : पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथे चिमुकलीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेने राज्यभर संतापाची लाट उसळलेली असतानाच, मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक येथून अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने मावळ तालुक्यात खळबळ उडाली असून, बालकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी वडगाव मावळ पोलिसांनी ५१ वर्षीय आरोपीला अटक केली असून, न्यायालयाने आरोपीला दिनांक ८ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक गावच्या हद्दीत एचडीएफसी. बँकेजवळील लंबोदर दूध डेअरीमध्ये दिनांक १ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी १२ वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडल्याचा आरोप आहे. आरोपीने पीडिता अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पीडिता ही २ वर्षे १० महिने २७ दिवसांची असून, तिची जन्मतारीख ७ ऑक्टोबर २०२३ अशी पोलिसांच्या नोंदीत नमूद आहे. या प्रकरणी पीडितेच्या २५ वर्षीय आईने वडगाव मावळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी बाळू नामदेव आसवले (वय ५१ वर्षे, रा. टाकवे बुद्रुक, ता. मावळ, जि. पुणे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ६५(२) तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO), २०१२ मधील कलम ४, ६ व १२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आईच्या फिर्यादीनंतर गुन्हा दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून दिनांक ३ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे २.५६ वाजता गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत स्टेशन डायरीमध्ये नोंद क्रमांक ०५/२०२६ करण्यात आली आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार, घटनास्थळ वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या उत्तरेस सुमारे १३ किलोमीटर अंतरावर आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला दि. ८ सप्टेंबर २०२६ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस कोठडीच्या कालावधीत घटनेशी संबंधित विविध बाबींचा तपास करण्यात येत आहे.
हे सुद्धा वाचा : कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; गळ्यावर व पोटावर बेदम मारहाण, मणक्याचे हाड तुटले…
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास
सदर कारवाई लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी, वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गादेकर आणि महिला पोलीस उपनिरीक्षक महेश्वरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. याप्रकरणी सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत, अशी माहिती वडगाव मावळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संतापाची भावना व्यक्त होत असून, चिमुकल्या बालिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीरपणे समोर आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास वडगाव मावळ पोलीस करीत आहेत.






