अनिल अंबानी आणि राणा कपूर यांच्या अडचणीत वाढ, CBI ने न्यायालयात दाखल केले आरोपपत्र (फोटो सौजन्य-X)
Anil Ambani News Marathi : केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) अनिल अंबानी आणि इतरांविरुद्ध एफएल आणि आरएचएफएल, उद्योगपती अनिल अंबानी यांच्या समूहाशी संबंधित कंपन्या आणि येस बँक आणि त्यांचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) राणा कपूर यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या मालकीच्या कंपन्यांमधील कथित फसव्या व्यवहारांप्रकरणी आरोपपत्र दाखल केले. अशा व्यवहारांमुळे बँकेला ₹२,७९६ कोटींचे नुकसान झाल्याचा आरोप सीबीआयने केला आहे. याप्रकरणी सीबीआयने म्हटले आहे की, अनिल अंबानी हे एडीए ग्रुपचे अध्यक्ष होते आणि आरसीएफएल आणि आरएचएफएलची होल्डिंग कंपनी रिलायन्स कॅपिटल लिमिटेडचे संचालक होते.
सीबीआयने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तपास यंत्रणेने 18 सप्टेंबर दोन प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रांपैकी एक अनिल अंबानी समूहाच्या कंपन्यांमधील आरसीएफएल आणि आरएचएफएलमधील फसव्या व्यवहारांशी संबंधित आहे आणि दुसरे येस बँक आणि राणा कपूर यांच्या पत्नी बिंदू कपूर आणि मुली राधा कपूर आणि रोशनी कपूर यांच्या मालकीच्या कंपन्यांमधील फसव्या व्यवहारांशी संबंधित आहे. राणा कपूर त्यावेळी येस बँकेचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) होते.
२०२२ मध्ये येस बँकेच्या मुख्य दक्षता अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून राणा कपूर, आरसीएफएल, आरएचएफएल आणि इतरांविरुद्ध दोन फौजदारी खटले दाखल करण्यात आले. तपासात असे दिसून आले की, २०१७ मध्ये येस बँकेने आरसीएफएलमध्ये अंदाजे ₹२,०४५ कोटी आणि आरएचएफएलमध्ये अंदाजे ₹२,९६५ कोटी रुपये नॉन-कन्व्हर्टेबल शेअर्स (एनसीडी) आणि व्यावसायिक कर्जाच्या स्वरूपात गुंतवले होते.
विज्ञप्तीत म्हटले आहे की, “केअर रेटिंग्ज त्यावेळी एडीए ग्रुपच्या आर्थिक परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. तरीही राणा कपूर यांच्या मान्यतेने ही गुंतवणूक करण्यात आली होती. कारण कंपनीची आर्थिक स्थिती ढासळत होती आणि तिची बाजारपेठेतील प्रतिष्ठा घसरत होती. त्यानंतर येस बँकेने आरसीएफएल आणि आरएचएफएलमधील या गुंतवणुकींमध्ये विविध पातळ्यांवर फेरफार केला. ज्यामुळे सार्वजनिक निधीचा पद्धतशीर गैरवापर झाल्याचे उघड झाले.”
सीबीआयने म्हटले आहे की, “तपासात राणा कपूर आणि अनिल अंबानी यांच्यातील कट रचल्याचेही उघड झाले आहे, ज्यामध्ये राणा कपूर यांनी त्यांच्या अधिकृत पदाचा वापर करून येस बँकेतील सार्वजनिक निधी आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या एडीए ग्रुप कंपन्यांमध्ये गुंतवला. त्या बदल्यात एडीए ग्रुपने राणा कपूर यांच्या कुटुंबियांना सवलतीच्या दरात कर्जे आणि गुंतवणूक दिली.” या फसवणुकीमुळे येस बँकेला अंदाजे २७९६.७७ कोटी रुपयांचे मोठे नुकसान झाले आणि आरसीएफएल, आरएचएफएल, इतर एडीए ग्रुप कंपन्या आणि राणा कपूर यांच्या कुटुंबियांना बेकायदेशीरपणे फायदा झाला.
आरोपपत्रात तपास यंत्रणेने पुढे म्हटले आहे की, “शिवाय अनिल अंबानींच्या सूचनेनुसार रिलायन्स निप्पॉन म्युच्युअल फंड्सने २०१७-१८ मध्ये राणा कपूर कुटुंबाच्या मालकीची कंपनी मॉर्गन क्रेडिट्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये ११६० कोटी रुपये गुंतवले. रिलायन्स निप्पॉन म्युच्युअल फंड्स ही रिलायन्स कॅपिटल लिमिटेडची आणखी एक उपकंपनी आहे. रिलायन्स निप्पॉन म्युच्युअल फंड्सने येस बँकेकडून २४९.८० कोटी रुपयांना एडीए ग्रुप डिबेंचर देखील खरेदी केले.”