गुपचूप उरकून घेतला बालविवाह, अल्पवयीन मुलगी गर्भवती होताच फुटले बिंग; पतीसह सासऱ्यावर गुन्हा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)
बुलडाणा : बालविवाह करणे कायद्याने गुन्हा आहे. याप्रकरणाची माहिती मिळताच गुन्हे दाखल झाल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. त्यानंतर आता बुलडाण्यात बालविवाह झाल्याचे उघडकीस आले. 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह लावल्याचे प्रकरण गर्भवती राहिल्यानंतर समोर आले. याप्रकरणी बोराखेडी पोलिसांनी पती, सासरा आणि वडिलांविरुद्ध लैंगिक अत्याचार, पॉक्सो व बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हे दाखल केले.
बोराखेडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या एका गावातील रहिवासी असलेल्या 16 वर्षीय मुलीचा नातेसंबंधातीलच एका 20 वर्षीय मुलासोबत गुजरातमधील कोकणगाव येथील एका मंदिरात सहा महिन्यांपूर्वी एप्रिल महिन्यात बालविवाह लावण्यात आला. लग्नानंतर मुलगी तिच्या मोताळा तालुक्यातील एका गावामधील सासरी राहू लागली. पतीसोबत शारीरिक संबंध आल्याने ती गर्भवती राहिली होती. दरम्यान, रक्षाबंधनाच्या सणाला ती माहेरी गेली. परंतु, पीडित मुलगी व तिच्या वडिलांमध्ये किरकोळ वाद झाला.
हेदेखील वाचा : Rupali Chakankar : “बालविवाह रोखण्यासाठी सामूहिक प्रयत्न…; राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकरांचे आवाहन
गावातील एका सुजाण तरुणीने पीडित मुलीस बुलढाणा येथील बाल कल्याण समितीसमोर हजर केले. मुलीस विचारणा केली असता तिने लग्नाविषयीची माहिती सांगितली. नंतर मुलीस सखी वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवण्यात आले. तिची वैद्यकीय तपासणी केली असता मुलगी गर्भवती असल्याची बाब समोर आली. याप्रकरणी मुलीच्या जबाबावरून बोराखेडी पोलिसांनी आरोपी पती सागर, वडील गोविंद आणि सासरा चंद्रसिंग यांच्याविरुद्ध बालविवाह अधिनियम आणि पॉक्सोअंतर्गत गुन्हे दाखल केले.
पुण्यातील शिरूर तालुक्यातही घडला होता प्रकार
दुसऱ्या एका घटनेत, हिवरे कुंभार (ता.शिरुर) येथे ऑक्टोबर 2023 मध्ये 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह केल्याची घटना घडली. यामध्ये अल्पवयीन मुलीने नुकतेच एका बाळाला जन्म दिल्याने सदर प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी मुलीच्या आई-वडिलांसह सासू-सासरे व पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला.
कायदा असूनही बालविवाह सुरुच
वयाच्या अठरा वर्षांच्या आतील मुलींचे लग्न करणे बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा असला तरी अजूनही आदिवासीबहुल अतिदुर्गम वाड्या-वस्त्यांवर राहणाऱ्या आदिवासी समाजात कोणालाही कळू न देता बालविवाह सुरूच असल्याचे कळते. या गुन्ह्यांपासून सुटका करण्यासाठी लहान वयातच लग्न न करताच मुलग- मुलगी एकत्रित राहण्याकडे त्यांचा अधिक कल असल्याचे दिसून येत आहे.
हेदेखील वाचा : बालविवाहाची समस्या आजही कायम! नियोजित बालविवाह प्रशासनाच्या सतर्कतेमुळे रोखण्यात यश