Pune Crime News: शहरात दोन धक्कादायक घटना उघडकीस आल्या आहेत. आझम कॅम्पसमध्ये कोयत्यांसह हाणामारीचा प्रकार समोर आला आहे, तर दुसरीकडे विश्रामबाग रोड परिसरात एका वृद्धाने तरुणीशी अश्लील वर्तन केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. आझम कॅम्प परिसरात झालेल्या हाणामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल आहे. या व्हिडीओत काही तरुण हातात कोयते घेऊन कॉलेजच्या परिसरात मारहाण करत असल्याचे दिसत आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, या हाणामारीत दोन जण जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अद्याप हाणामारीचं नेमकं कारण स्पष्ट झालेलं नाही. या प्रकारानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. कॉलेज कॅम्पससारख्या सुरक्षित परिसरात कोयते आणि अन्य घातक हत्यारे नेमकी कशी आणली गेली, यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
हाणामारीचा थरार सोशल मीडियावर व्हायरल
संबंधित व्हिडीओमध्ये काही तरुण हातात धारदार शस्त्र घेऊन एकमेकांवर झडप घालत असल्याचे दिसून येते. तसेच, ही झटापट पाहण्यासाठी परिसरात नागरिकांची गर्दी झाल्याचेही स्पष्ट दिसत आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. या मारहाणीत दोन तरुण जखमी झाले असून, पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. हाणामारीचं कारण अद्याप अस्पष्ट असून, आरोपींचा शोध सुरू आहे.
या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे आणि संबंधित महाविद्यालयातील व्यवस्थापन व पालकांनी संभ्रम व्यक्त केला आहे. सध्यातरी घटना का घडली व जबाबदार कोण, याबद्दल पोलिस अधिक तपास करत आहेत. पुण्याच्या पोलिसांनी हे प्रकार विरळ नसून शहरात दहशत निर्माण करणाऱ्या ‘कोयता गँग’शी संबंधित असल्याचेही पाहण्याची शक्यता वर्तवली जाते .
७३ वर्षीय वृद्धाने केली अश्लील छेडछाड
दुसऱ्या घटनेत, विश्रामबाग रोड परिसरात एका ७३ वर्षीय इसमाने २७ वर्षीय तरुणीशी अश्लील वर्तन केल्याचा प्रकार घडला आहे. पीडित तरुणी खासगी क्लिनिकमध्ये काम करत असून, तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. या दोन्ही घटनांमुळे पुण्यात सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, पोलिसांकडून दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे.