पुणे: सीमाशुल्क विभागाने (कस्टम) वेगवेगळ्या कारवाईत जप्त केलेला सहा हजार किलो अमली पदार्थाचा साठा नुकताच रांजणगाव एमआयडीसी येथे नष्ट करण्यात आला. एका खासगी कंपनीच्या भट्टीत हा अमली पदार्थ नष्ट करण्यात आला. सीमाशुल्क विभागाने वर्षभरात वेगवेगळ्या कारवाई करून अमली पदार्थ तस्करी प्रकरणी १४ गुन्हे दाखल केले होते. या कारवाईत २३ जणांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून सहा हजार किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते.
अमली पदार्थांचा साठा न्यायालयाच्या परवानगीने नष्ट करण्यात येतो. त्यानूसार नष्ट करण्याची प्रक्रिया पार पाडण्यात आली. दरम्यान कस्टमच्या पथकाने १५५२ किलो गांजा, २७९ किलो चरस, मेफेड्रोन, कोकेन असे अमली पदार्थ जप्त केले. जप्त केलेल्या अमली पदार्थ नष्ट करण्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती.
कस्टमच्या पुणे विभागाचे अध्यक्ष यशोधन वनगे यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र एन्व्हाॅयरो लिमिटेड कंपनीच्या भट्टीत जप्त केलेला अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. कस्टमने वेगवेगळ्या पुणे विभागात कारवाई केली होती. पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधूदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश होतो, अशी माहिती कस्टमचे आयुक्त यशोधन वनगे यांनी दिली.
सायबर गुन्हेगारांचा सुळसुळाट वाढला
सायबर गुन्ह्यांचा आलेख वाढतच चालला असून, पुन्हा तीन घटनांमध्ये दोन तरुणी अन् एका तरुणाची ३३ लाखांना गंडा घातला आहे. वेगवेगळ्या बहाण्याने तसेच पोलीस कारवाईची भिती घालून ही फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलीस ठाण्यात ३० वर्षीय तरुणीने तक्रार दिली आहे. त्यानूसार, मोबाईल धारक व वापरकर्ते यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार तरूणी नोकरी करते. दरम्यान, तिला सायबर चोरट्यांनी एक लिंक पाठवून त्यांना नुवामा प्रो अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले. तसेच, त्यानंतर त्याच्यावर पैसे जमा करण्यास भाग पाडले. त्यांना या अॅपवरून भरघोस नफा मिळत असल्याची बतावणी केली. त्यांनी १० लाख ९५ हजार रुपये भरले. मात्र, त्यांना नफा मिळाला नाही. दुसऱ्या घटनेत तरुणाची तब्बल १२ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात २६ वर्षीय तरुणाने तक्रार दिली आहे. तरुणाला युट्यूब पेजला लाईक्स व सबस्क्राईब केल्यावर मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखवून त्याला पैसे भरण्यास भाग पाडले. परंतु, त्याला कसलाही नफा न देता त्याची फसवणूक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा: Cyber Crime: सायबर गुन्हेगारांचा सुळसुळाट वाढला; ३ जणांची तब्बल ‘इतक्या’ लाखांची फसवणूक
सायबर चोरट्यांकडून पोलीस कारवाईची भिती दाखवून फसवणूकीचे सत्र कायम असून, पुण्यातील एका २८ वर्षीय नोकरदार तरुणीला १० लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. तक्रारदार तरुणीला मुंबई ते इराण असे पाठविलेल्या पार्सलमध्ये कालबाह्य पाच पासपोर्ट, क्रेडीट कार्ड आणि पेन ड्राईव्ह सापडले आहे. त्यामुळे तुमचे खाते तपासावे लागेल असे सांगितले.