शिरवळ गुटखा प्रकरणी मुख्य सूत्रधार निलेश ललवाणीला चार दिवसांची पोलीस कोठडी
शिरवळ : शिरवळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध गुटखा साठा जप्त करण्यात आलेल्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार निलेश ललवाणी याला अखेर अटक करण्यात आली आहे. शिरवळ पोलिसांनी सोमवारी उशिरा पुणे येथे शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर मंगळवारी न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
शिरवळमध्ये एका अपार्टमेंटमधील दोन गाळ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा साठवला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, शिरवळ पोलिसांनी धाड टाकून 1 कोटी 6 लाख 19 हजार 270 रुपयांचा गुटखा आणि गुटखा उत्पादनासाठी लागणारे साहित्य जप्त केले. याप्रकरणी आठ संशयित आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, मुख्य सूत्रधार निलेश ललवाणी हा फरार होता.
शिरवळ पोलिसांनी कसून तपास करून त्याचा माग काढला आणि अखेर पुण्यात त्याला अटक केली. पोलिसांनी त्याला शिरवळ येथे आणून मंगळवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
या कारवाईमुळे गुटख्याच्या अवैध धंद्याविरोधात मोठा धक्का बसला आहे. पोलिसांनी या प्रकरणातील इतर आरोपींवरही कारवाईचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात गुटखा विक्रीस बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर त्याची तस्करी आणि विक्री सुरू असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे पोलिसांच्या या कारवाईचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे. पुढील तपास शिरवळ पोलिस करत आहेत.
पोलिसांची मोठी कारवाई
स्थानिक पोलिसांनी शहरातील उच्चभ्रू सोसायटीतील एका गोडाऊनवर मोठी कारवाई करत अवैध गुटखा आणि पानमसाला साठ्याचा पर्दाफाश केला होता. विशेष म्हणजे, या ठिकाणी गुटखा उत्पादनासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरली जात होती. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. परिसरातील नागरिकांमध्येही चर्चा सुरु होत्या. त्यानंतर आता यातील आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.