सौजन्य फोटो - सोशल मिडीया
कोलकाता : पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांच्या सुरक्षेत मोठा भंग झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी कालीघाट परिसरात घडली. दुर्गापूजा मंडपाच्या उद्घाटनासाठी जात असताना एका महिलेने ममता बॅनर्जी यांच्याजवळ आक्रमकपणे जाण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. या महिलेच्या हातात चाकू असल्याचा दावाही पक्षाच्या नेत्यांनी केला आहे. या घटनेत ममता बॅनर्जी यांना कोणतीही इजा झालेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास ममता बॅनर्जी त्यांच्या कालीघाट येथील निवासस्थानाजवळून मिलन संघाच्या दुर्गापूजा मंडपाच्या उद्घाटनासाठी जात होत्या. त्यावेळी एक महिला अचानक त्यांच्या सुरक्षा कडेपाशी आली. तिने ममता बॅनर्जी यांना ‘पिशी’ म्हणजेच आत्या म्हणून संबोधले आणि त्यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला, असा दावा तृणमूलच्या तक्रारीत करण्यात आला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार डोला सेन यांनी कालीघाट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनुसार, संबंधित महिला कथितरित्या नशेच्या अवस्थेत होती आणि तिने शिवीगाळ करत ममता बॅनर्जी यांच्याजवळ जाण्याचा प्रयत्न केला. तिच्याकडे चाकू असल्याचे नंतर लक्षात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तृणमूल कार्यकर्त्यांनी महिलेला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. मात्र, पोलिसांनी अद्याप महिलेच्या हातात चाकू असल्याच्या दाव्याची पुष्टी केलेली नाही. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ममता बॅनर्जी घराबाहेर पडत असताना संबंधित महिलेने त्यांना गाठले आणि दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले असून, घटनेचे व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.
ममता बॅनर्जी यांना झेड-प्लस सुरक्षा व्यवस्था आहे. असे असतानाही एक महिला त्यांच्या सुरक्षा कडेपाशी पोहोचल्याने सुरक्षाव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. तृणमूल काँग्रेसने या घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. पक्षाच्या नेत्यांनी हा प्रकार मोठ्या कटाचा भाग आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या महिलेची चौकशी सुरू असून तिच्या वर्तनामागील नेमके कारण काय होते, ती ममता बॅनर्जी यांच्यापर्यंत कशी पोहोचली आणि तिच्याकडे खरोखर चाकू होता का, याचा तपास केला जात आहे. या घटनेचे फोटो आणि व्हिडिओही पोलिसांकडे देण्यात आले आहेत. तपास पूर्ण झाल्यानंतरच हल्ल्याच्या प्रयत्नाबाबतचे नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.






