
Mumbai Crime : दोघींच्या नादात ३२ तरुण गेले दिल्लीला, अन् त्यांच्या सोबत जे घडलं ते एकुण पोलिसही...
सिंगापूरमध्ये नोकरीचे आमिष
मिळालेल्या माहितीनुसार, आशना शेट्टी आणि दिव्या पांचाल यांनी ३२ तरुणांना सिंगापूर येथे नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील तक्रारदार रमेश शेट्टी हे परवानाधारक परदेशी रोजगार आणि मनुष्यबळ सल्लागार म्हणून व्यवसाय करतात. दोन्ही महिलांनी दिलेल्या आश्वासनानुसार रमेश शेट्टी यांनी संबंधित ३२ तरुणांना एकत्र केले. त्यानंतर नोकरीच्या प्रक्रियेसाठी या तरुणांकडून एकूण १३ लाख रुपये धनादेशाद्वारे आशना शेट्टी आणि दिव्या पांचाल यांच्या ‘व्ही.ए. इमिग्रेशन’ या कंपनीला देण्यात आले.
वैद्यकीय तपासणीसाठी दिल्लीला पाठवले
रक्कम घेतल्यानंतर संबंधित तरुणांना वैद्यकीय तपासणीसाठी दिल्ली येथे पाठवण्यात आले. मात्र, तेथे त्यांना देण्यात आलेला पत्ता चुकीचा असल्याचे समोर आले. त्यामुळे तरुणांना स्वतःच्या खर्चाने दुसऱ्या ठिकाणी जाऊन वैद्यकीय तपासणी करून घ्यावी लागली. यानंतर दोन्ही महिलांनी तरुणांना सिंगापूरमध्ये नोकरीसाठी आवश्यक असल्याचे सांगत काही कागदपत्रे दिल्याचा आरोप आहे.
बनावट ‘हॉलिडे परमिट’ दिल्याचा आरोप
पोलिसांच्या तक्रारीनुसार, तरुणांना देण्यात आलेले ‘हॉलिडे परमिट’ बनावट असल्याचे पुढे समोर आले. या कागदपत्रांच्या आधारे सिंगापूरमध्ये नोकरीसाठी जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर संबंधित तरुणांना अडचणींचा सामना करावा लागला. सिंगापूर सरकारने संबंधित तरुणांना पुन्हा नोकरीसाठी सिंगापूरमध्ये येण्यास नकार दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे तरुणांच्या लक्षात आले. या प्रकारामुळे त्यांना आर्थिक तसेच मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले.
जुहू पोलिसांकडून दोघींना अटक
या संपूर्ण प्रकाराबाबत रमेश शेट्टी यांनी जुहू पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आशना शेट्टी आणि दिव्या पांचाल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. परदेशात नोकरीच्या आमिषाने आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का, या प्रकरणात आणखी कोणी सहभागी आहे का आणि संबंधित कागदपत्रांचा स्रोत काय आहे, याचा तपास जुहू पोलीस करत आहेत.