
Pune News, Crime News, Law and Order, Police Action,
५ ऑक्टोबर २०२६ रोजी ओतूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात व्यक्तींनी घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली होती. ओतूर आणि नारायणगाव परिसरात अशाच प्रकारच्या घरफोडीच्या घटना घडल्याने पोलिसांसमोर या गुन्ह्यांचा छडा लावण्याचे आव्हान निर्माण झाले होते.
पुण्यात बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघड; तब्बल ५ लाख ६४ हजारांच्या नोटांसह चौघांना अटक
या घटनांची गंभीर दखल घेत पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गुन्हे उघडकीस आणून आरोपींना अटक करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला.
घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासताना पोलिसांना एक संशयित कार दिसून आली. या कारचा माग काढण्यासाठी ओतूरपासून नाशिकपर्यंतच्या मार्गावरील सुमारे १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. तांत्रिक तपास आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित कारचा वापर करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात आला.
नाशिकमधील इंदिरानगर आणि वडाळा परिसरात तपास केला असता, सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणारी कार सोनू उर्फ मोहम्मद शरीफ रसूल शेख वापरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याच्यासोबत वसीम पठाण आणि अदनान पठाण हे दोन साथीदार असल्याचेही तपासात समोर आले.
स्थानिक गुन्हे शाखा आणि ओतूर पोलिसांच्या पथकाने सापळा रचून नाशिकमधील वडाळा आणि लासलगाव परिसरातून तिघांना ताब्यात घेतले. त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.
१. वसीम मुनीर पठाण (वय २९), रा. पिंपळगाव नजीक, लासलगाव, ता. निफाड, जि. नाशिक.
२. अदनान युनूस पठाण (वय २६), सध्या रा. वडाळा, इंदिरानगर, नाशिक; मूळ रा. पिंपळगाव नजीक, लासलगाव, ता. निफाड, जि. नाशिक.
३. सोनू उर्फ मोहम्मद शरीफ रसूल शेख (वय ४०), रा. पिंपळगाव नजीक, लासलगाव, ता. निफाड, जि. नाशिक.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत संबंधित घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सहभाग असल्याची कबुली आरोपींनी दिल्याचे प्रसिद्धिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
आरोपींकडून चोरीस गेलेले १९ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, २ किलो ७७० ग्रॅम चांदी, दोन लाख रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण ३८ लाख ५० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याशिवाय गुन्हे करताना पकडले जाऊ नये आणि परस्परांमध्ये संपर्क साधता यावा, यासाठी वापरण्यात आलेले वायरलेस वॉकी-टॉकी संचही पोलिसांनी जप्त केले आहेत. चोरीच्या चांदीचे दागिने खरेदी केल्याच्या आरोपावरून सागर अशोक शिंदे (वय ३०, रा. विंचूर, ता. निफाड, जि. नाशिक) यालाही अटक करण्यात आली आहे.
या कारवाईत ओतूर पोलीस ठाण्यातील तीन आणि नारायणगाव पोलीस ठाण्यातील एका घरफोडीच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
– ओतूर पोलीस ठाणे : गुन्हा रजिस्टर क्रमांक २६५/२०२६.
– ओतूर पोलीस ठाणे : गुन्हा रजिस्टर क्रमांक २१८/२०२६.
– ओतूर पोलीस ठाणे : गुन्हा रजिस्टर क्रमांक १३७/२०२६.
– नारायणगाव पोलीस ठाणे : गुन्हा रजिस्टर क्रमांक २०३/२०२६.
हे गुन्हे भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार नोंदविण्यात आले आहेत.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलीस निरीक्षक महादेव शेलार, ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार दीपक साबळे, पोलीस अंमलदार संदीप वारे, राजू मोमीन, अक्षय नवले, अभिमन्यू मोटे, भारत मोहोळ, चेतन पाटील तसेच ओतूर पोलीस ठाण्याचे नरेंद्र गोराणे, बाळशिराम भवारी, विशाल गोडसे आणि धनंजय पालवे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.
या प्रकरणाचा पुढील तपास ओतूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव करीत आहेत. या टोळीने अन्य ठिकाणीही घरफोडीचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि पोलिसांच्या समन्वयातून चार घरफोडीचे गुन्हे उघडकीस आल्याने जुन्नर तालुक्यातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
१)ओतूर पोलीस स्टेशन हद्दीतील घरफोडीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी नागरिकांना घर बंद करून बाहेर जाताना किंवा रात्रीच्या वेळी सुरक्षितेची काळजी घेण्यासाठी, घरी सीसीटीव्ही कॅमेरे व दरवाज्याला सेन्सर लॉक बसवावेत. आपल्या आजूबाजूला काही संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ पोलिसांना कळविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. रात्रीच्या वेळी होणाऱ्या घरफोड्यांमुळे नागरिकांमध्ये निर्माण होणारी भीती दूर करण्यासाठी अशा गुन्ह्यांचा तपास वेगाने आणि प्रभावीपणे होणे आवश्यक आहे.
ज्ञानेश्वर बाजगिरे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक ओतूर पोलीस स्टेशन