बिल काढण्यासाठी मागितली 2 लाखांची लाच ; अकलूज नगरपरिषदेच्या स्वच्छता निरिक्षकावर ACB कडून गुन्हा दाखल
अकलूज: नगरपरिषद अकलूज येथे स्वच्छता निरिक्षक म्हणून कर्तव्यावर असणाऱ्या नितीन सिद्राम पेटकर वय ४० वर्षे रा. अक्कलकोट यांच्यावर लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाचेची मागणी केल्याबद्दल सापळा रचुन कारवाई केली आहे. या बाबत लाच लुचपत विभागाचे पोलीस निरिक्षक गणेश पिंगुवाले यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार यातील तक्रारदार यांची श्री गणेश इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस, बारामती नावाची कंपनी असून सदर कंपनी विविध नगरपरिषद, नगर पालिकांना साप सफाई व इतर कामांकरीता मनुष्यबळ पुरवठा करत असते.
सदर कंपनीच्या वतीने विविध आस्थापनांशी समन्वय साधुन टेंडर भरणे, मनुष्यबळ पुरवणे, पत्रव्यवहार करणे, वेतनासाठी निधी प्राप्त करून घेणे इ. शासकीय कामे करते. अकलूज नगर परिषदेने शहरातील रस्ते, बाजारपेठा, वाणिज्य गाळे, शौचालय साप सपाई करणेकामी मनुष्यबळ पुरवठा करणेकरीता प्रसिध्द केलेले टेंडर श्री गणेश इंडस्ट्रीयल सर्व्हिसेस, बारामती यांना मंजुर झाले. सदर कंपनीने अकलूज नगरपरिषदेस मनुष्यबळ पुरवठा केला होता.
त्यानंतर निविदा दर मंजुर करून वर्क ऑर्डर देताना यातील नितीन पेटकर यांनी तक्रारदार यांचेकडे कामगारांच्या मासिक वेतनाच्या बिलाच्या तीन टक्के रक्कम व वर्क ऑर्डर मंजुरीसाठी सुमारे १ लाख ९५ हजार रूपये लाचेची मागणी केली. यावरून वर नमुद स्वच्छता निरिक्षक नितीन पेटकर यांचे विरूध्द अकलूज पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामिण येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरची कामगिरी पोलीस निरिक्षक गणेश पिंगुवाले, पोलीस अंमलदार कोळी, पोना. संतोष नरोटे, पोह. राहुल गायकवाड या लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
सांगलीत महिला पोलिस हवालदार लाचेच्या जाळ्यात
सांगलीमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. महिला पोलीस लाच घेताना हाती आले आहे. सांगलीमध्ये पोलिसांना रंगेहात पकडले आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पन्नास हजार रुपयांची लाच घेताना विश्रामबाग पोलिस ठाण्यातील महिला हवालदार यांना पकडले आहे. अटक करण्यात आलेल्या महिला पोलीस हवालदाराचे नाव मनिषा नितीन कोंगनोळीकर उर्फ भडेकर (वय ४२, रा. शारदानगर, सांगली) असे आहे. त्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी रंगेहाथ पकडले.
हेही वाचा: सांगलीत महिला पोलिस हवालदार लाचेच्या जाळ्यात; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले
एका फसवणूक प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी व चौकशीत मदत करण्यासाठी मनिषा कोंगनोळीकर यांनी एका व्यक्तीकडे पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारण्यासाठी मंगळवारी सांगलीवाडी येथील डॉ. पतंगराव कदम महाविद्यालयाजवळ त्यांनी तक्रारदारास बोलावले. याबाबत संबंधित व्यक्तीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे यासंदर्भात तक्रार केली. त्यानुसार विभागाच्या पथकाने सांगलीवाडीत सापळा रचला होता. तक्रारदाराकडून कोंगनोळीकर यांनी पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्यानंतर पथकाने त्यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी कोंगनोळीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.