मांजरीची क्रूर हत्या, इंस्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला अन्...; आरोपीला ठोकल्या बेड्या
पलक्कड : केरळमधील पलक्कडमधून एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. एका ३२ वर्षीय व्यक्तीने मांजरीची निर्घृण हत्या करून ती क्रूर कृत्ये सोशल मीडियावर पोस्ट केल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे. या कृत्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. चेरपुलासेरीजवळील मुथुकुलम-परंबा येथील ट्रक चालक शाजीर असे आरोपीचे नाव आहे. स्थानिक प्राणी बचाव स्वयंसेवकाने दाखल केलेल्या तक्रारीनंतर मंगळवारी संध्याकाळी त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाजीरने मांजरीला त्याच्या गाडीत मारण्यापूर्वी अन्नाचे आमिष दाखवले होते. त्याने त्याच्या इंस्टाग्रामवर क्रूर कृत्यांचे दृश्य पोस्ट केले. क्रूरता एवढ्यावरच थांबली नाही – त्याच्यावर जॅक लीव्हरने कापलेल्या डोक्यासह अवशेष फोडल्याचा आरोप आहे. हे दृश्ये, जे लवकरच व्हायरल झाले, त्यामुळे रहिवासी आणि प्राणी हक्क गटांमध्ये संताप निर्माण झाला. प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहिताच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. प्राथमिक चौकशीत दृश्यांची सत्यता पडताळून अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणाची पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.
फलटणमधील संतापजनक प्रकार
फलटणमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. फलटण शहरातील उपनगरात राहत असलेल्या एका केवळ ९ वर्षाच्या चिमुरडीला तिच्या सख्ख्या मामाने अमानुषपणे मारहाण केली असून, या मारहाणीमुळे संबंधित चिमुरडीच्या मनावर आघात झाला आहे. घडलेला मारहाणीचा प्रकार चिमुरडीने तिच्या वडिलांना सांगितल्यानंतर ही घटना समोर आली आहे. दरम्यान, मामाच्या विरोधात चिमुरडीचे पिता फलटण शहर पोलिस ठाण्यात गेले असता शहर पोलिसांनी अक्षरश: त्यांना हाकलून लावले. शेवटी हतबल झालेल्या पित्याने सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे धाव घेवून तक्रार मांडली आहे.
पत्नीचा गळा चिरून निर्घृण खून
पत्नी नांदायला न आल्याच्या रागातून तिचा गळा चिरून निर्घृण खून केल्यानंतर पसार झालेल्या पतीला विमानतळ पोलिसांनी अवघ्या दोन तासांत अटक केली आहे. खांदवेनगर परिसरात ही घटना घडली होती. प्रेम उत्तम जाधव (रा. खांदवेनगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. तर, ममता प्रेम जाधव असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. २७ जुलै रोजी रात्री ही घटना घडली होती.