
Pune ATS Raids:
Pune ATS Raids: काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (ATS) पुण्यात मोठी कारवाई करत कोंढवा परिसरातून एका संशयित दहशतवाद्याला अटक केली होती.. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव झुबेर हंगरगेकर असे असून, त्याचे अल-कायदा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याचा गंभीर संशय होता. या संशयाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादविरोधी पथकाने त्याच्या कोंढवा येथील निवासस्थानी छापा मारून विविध साहित्य जप्त केले. झुबेर हंगरगेकरचा अल-कायदा नेटवर्कशी थेट अथवा अप्रत्यक्ष संबंध आहे का, याची सखोल चौकशी सुरू आहे.
झुबेरची चौकशी सुरू असताना आता दहशतवाद विरोधी पथकाने पुन्हा एकदा कोंढवा भागात छापेमारी सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. दोन दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीत झालेल्य बॉम्बस्फोटानंतर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. याच कारवाईचा भाग म्हणून आज पुण्यातील कोंढवा भागात पुन्हा एकदा एटीएसने छापेमारी केली. झुबेरशी संबंधित तपासाचा भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. एटीएस जम्मू-काश्मीर प्रकरणाचा महाराष्ट्राशी काही संबंध आहे का हे शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
हंगरगेकर हा मूळचा सोलापूरचा असून, तो मागील १५ वर्षांपासून पुण्यात आयटी क्षेत्रात कार्यरत होता. तो उच्चशिक्षित असून, विविध नामांकित कंपन्यांमध्ये काम केल्याचा त्याचा अनुभव आहे. सध्या तो कल्याणीनगर येथील एका सॉफ्टवेअर कंपनीत सिनीअर QA Analyst या पदावर कार्यरत होता.
दरम्यान, आजच्या कारवाईत दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) पुण्यातील आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी सुरू आहे. दहशतवादी झुबेर हंगरगेकर याच्याशी या व्यक्तीचे संबंध असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.
एटीएसने या संशयिताच्या घरावर छापेमारी करत झडती घेतली आहे. या दरम्यान काही संशयास्पद वस्तू मिळण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. राज्यात या प्रकरणाशी संबंधित अनेक ठिकाणी एटीएसकडून एकाच वेळी छापेमारी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या कारवाईनंतर राज्यातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या असून, एटीएसकडून नेटवर्कच्या इतर सदस्यांचा शोध घेण्यासाठी व्यापक तपास सुरू आहे.
मुंब्य्रातही एटीएसची कारवाई
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मंगळवारी ठाणे जिल्ह्यातील मुंब्रा परिसरात मोठी कारवाई केली. काही दिवसांपूर्वी पुण्यात करण्यात आलेल्या एटीएसच्या कारवाईदरम्यान काही संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यांच्या चौकशीत मुंब्रा येथील एका शिक्षकाचा संबंध समोर आल्यानंतर एटीएसने ही धाड टाकली.
मिळालेल्या माहितीनुसार, एटीएसच्या पथकाने मुंब्र्यातील कौसा विभागातील शिक्षकाच्या निवासस्थानी तपास मोहीम राबवली. यावेळी अधिकाऱ्यांनी घराची सखोल तपासणी करून मोबाईल फोन, संगणक आणि काही कागदपत्रे ताब्यात घेतली. यानंतर संबंधित शिक्षकाला पुढील चौकशीसाठी मुंबईतील कुर्ला परिसरातील त्याच्या दुसऱ्या घरात नेण्यात आले असून, तिथेही एटीएसचा तपास सुरू आहे.