
Pune Crime News:
Pune Crime News: पुण्यात अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवादी झुबेर हंगरगेकरच्या मोबाईल कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये पाकिस्तानचा नंबर आढळल्याने तपास यंत्रणेत खळबळ उडाली आहे. या माहितीसमोर आल्यानंतर पुणे पोलिसांनी चौकशीची गती अधिक वाढवली आहे.
महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) झुबेर हंगरगेकरला काही दिवसांपूर्वी पुण्यातून अटक केली होती. त्याची सखोल चौकशी सुरू असून त्याच्या लॅपटॉपमधूनही मोठ्या प्रमाणात डेटा मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली. झुबेरचा दिल्ली स्फोट प्रकरणाशी संबंध आहे का? याचाही तपास सुरू करण्यात आला आहे. त्याच्या संपर्क, आर्थिक व्यवहार, तसेच डिजिटल फुटप्रिंटचा बारकाईने अभ्यास केला जात असल्याचे एटीएस सूत्रांकडून समजते.
संशयित दहशतवादी झुबेर हंगरगेकरच्या मोबाईल तपासात महत्त्वाचे धागेदोरे समोर आले आहेत. महाराष्ट्र एटीएसला त्याच्या जुन्या आणि सध्याच्या हँडसेटमधून एकूण ५ आंतरराष्ट्रीय नंबर आढळले असून त्यात पाकिस्तानसह विविध आखाती देशांचे संपर्क असल्याचे उघड झाले आहे.
एटीएसच्या तपासानुसार, झुबेरच्या जुन्या हँडसेटमध्ये १ पाकिस्तानचा नंबर, २ सौदी अरेबियाचे नंबर, १ ओमानचा नंबर, १ कुवेतचा नंबर असे एकूण पाच आंतरराष्ट्रीय क्रमांकांचा समावेश आहे. तर झुबेर सध्या वापरत असलेल्या मोबाईलमध्ये १ ओमानचा तर ४ सौदी अरेबियाचे असे नंबर सेव्ह असल्याचे आढळले आहे. या सर्व नंबरांविषयी चौकशी केली असता हे संपर्क आपल्याला माहित नाहीत, अशी प्रतिक्रिया झुबेर हंगरगेकरने एटीएससमोर दिल्याचे सूत्रांनी सांगितले. या नंबरच्या मालकांची ओळख, संवादाचा इतिहास आणि त्यांचे संभाव्य नेटवर्क याबाबत एटीएसकडून पुढील तपास सुरू आहे.
अल कायदा इन इंडियन सबकाँटिनेन्ट (AQIS) या दहशतवादी संघटनेच्या समर्थनार्थ जिहादाचा प्रसार व प्रचार करून देशाच्या एकता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवादी जुबेर इलियास हंगरगेकर याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. एटीएसने झुबेरला अटक केल्यानंतर त्याची सखोल चौकशी केली.
ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे दहशतवादी विचारसरणीचा प्रसार, संपर्कजाळे निर्माण करण्याचे प्रयत्न आणि देशविरोधी गतिविधीमध्ये सहभागाबाबत गंभीर आरोप त्याच्यावर करण्यात आले आहेत. तपास यंत्रणा त्याच्या डिजिटल क्लू, संवाद, तसेच आंतरराष्ट्रीय संपर्कांचा तपास करत आहे. पोलिसांनी न्यायालयाकडे पुढील तपासासाठी कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा आदेश दिला.
संशयित दहशतवादी जुबेर हंगरगेकरच्या लॅपटॉपमधून १ टीबीपेक्षा अधिक डिजिटल डेटा मिळाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्या लॅपटॉप आणि मोबाईलमध्ये आक्षेपार्ह स्वरूपाच्या अनेक फाइल्स आढळल्या असून त्यांचे विश्लेषण महाराष्ट्र एटीएसकडून सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, लॅपटॉपमधील फाइल्सच्या फॉरेन्सिक तपासातून दहशतवादी कार्यात सहभागाचे सबळ पुरावे गोळा करण्याचे काम गतीने सुरु आहे. डिजिटल कंटेंट, चॅट हिस्टरी, दस्तऐवज, संभाव्य संपर्कजाळे व इतर डेटा घटकांचा बारकाईने अभ्यास केला जात आहे.
अल कायदा या जागतिक दहशतवादी संघटनेसाठी कार्यरत असल्याच्या आरोपावरून एटीएसने झुबेरला अटक केली होती. या प्रकरणी विशेष न्यायालयाने झुबेर हंगरगेकरची गिरफ्त न्यायालयीन कोठडीत करण्याचा आदेश दिला आहे. न्यायालयाने पोलिस कोठडीचा हक्क अबाधित ठेवत पुढील तपासासाठी आवश्यक ती मुभा पोलिसांना दिली आहे.