जेलमधून मुक्त होताच तरुणाला मारहाण
छत्रपती संभाजीनगर : जालना येथील तरुणाचा सात जणांनी पाठलाग करून रिक्षा अडवून जीवघेणा हल्ला केला. तसेच लाकडी दांड्यांनी मारहाण करत रिक्षेची समोरील काच फोडली. ही घटना शुक्रवारी (दि.१४) दुपारी साडेबाराच्या सुमारास हर्मुल टी पॉईंट ते सिडको बसस्थानकाकडे जाणाऱ्या रोडवर घडली. हल्ला झालेला तरुण मध्यवर्ती कारागृह हर्सल येथून निर्दोषमुक्त नुकताच झाला. त्यानंतर त्याच्यावर हा हल्ला करण्यात आला.
लखन प्रल्हाद मिसाळ (वय ३३, रा. भिमनगर रामनगर, जालना) याने फिर्याद दिली. त्यानुसार, त्याची सातारा व जालना पोलिस ठाण्यातील गुन्ह्यातून गुरुवारी (दि.१३) मुक्तता झाली. शुक्रवारी तो आपल्या कुटुंबीयांसोबत गणेश लोंढे यांच्या रिक्षात (एमएच-२१-बीजी-१८३१) जालना जाण्यास निघाला होता. लखन मिसाळची रिक्षा कलावती लॉन्सच्या समोर पोहोचताच अचानक मागून आलेल्या एक रिक्षा पुढे येऊन आडवा लावण्यात आला. त्यातून पाच व्यक्ती उतरले, तर मागोमाग दोन दुचाकींवर आणखी दोन जण आले. हाच तो आहे ! असा आरडा-ओरड करत त्यांनी लाकडी दांड्याने हल्ला चढवला.
आरोपींपैकी एकाने मिसाळच्या उजव्या हातावर दांड्याने वार केला. जीवाला धोका जाणवल्याने त्याने गणेशला रिक्षा थांबवू नको, पुढे घेऊन जा, अशी विनंती केली. मात्र, हल्लेखोरांनी रिक्षाची समोरील काच फोडत तसेच मागील रिक्षाचे टफर तोडत मोठे नुकसान केले.
जीव मुठीत धरून पळू लागला अन्…
जीव मुठीत धरत मिसाळ व त्याचे नातेवाईक रिक्षा वेगात चालवत आंबेडकर चौकाजवळ पोहोचले. तेथे मनपा सुरक्षा दलाचे जवान दिसल्याने त्यांनी रिक्षा थांबवून संपूर्ण प्रकार सांगून मदत मागितली. परिसरात गर्दी जमू लागल्याने आरोपी गाड्यांसह पसार झाले. या हल्ल्यात मिसाळच्या हाताला मुक्का मार लागून दुखापत झाली असून, रिक्षाची काच फुटताना त्याचा मावस भाऊ अभि राजू बावस्कर हा देखील जखमी झाला. याप्रकरणाचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे.
हेदेखील वाचा : Nanded Crime: खूनाचा बदला खून! १६ वर्षांपूर्वी वडिलांची झाली होती हत्या, २० वर्षीय मुलाने घेतला बदला






