Pune Crime News: पुण्यात 'स्पा' सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांकडून तीन तरुणींची सुटका
पुणे: कोंढवा भागात स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक विभागाने छापा कारवाई केली. कारवाईत पोलिसांनी परदेशातील तरुणीसह तीन जणींची सुटका केली असून स्पा सेंटरचा मॅनेजर, मालकावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मॅनेजर शिव राजेश भोसले (वय.२१,रा. एनआयबीएम रोड), स्पा मालक निखिल राजेंद्र नाईक (२६, रा. फुरसुंगी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत महिला सहायक पोलीस उपनिरीक्षक छाया जाधव यांनी तक्रार दिली आहे. गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कामगिरी केली.
शहरातील अवैध धंदे बंद करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. तरीही छुप्या पद्धतीने हे अवैध धंदे सुरू आहेत. त्यातही शहरात वेश्या व्यवसाय तेजीत सुरू असल्याचे दिसत आहे. स्पा सेंटरच्या नावाखाली हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविले जात आहेत. यादरम्यान, एनआयबीएम रस्त्यावरील आयरीन स्पा’ सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक व व्यापार प्रतिबंधक कक्षाला मिळाली.
त्यानुसार बनावट ग्राहक पाठवून खात्री करण्यात आली. तेथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे समोर आले. नंतर पथकाने शनिवारी (दि.३०) दुपारी छापा टाकला. त्यावेळी आरोपी भोसले हा पिडीत तरुणींना पैशाचे आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे पुढे आले. त्यानुसार पोलिसांनी भोसले आणि स्पा मालक नाईक यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर, तीन पिडीत तरुणींची सुटका करून त्यांची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. पोलिसांनी स्पा सेंटरमधून मोबाईल व इतर साहित्य असे ७६ हजार रुपयांचे साहित्य जप्त केले आहेत.
अल्पवयीन मुलीला शरीर सुखाची मागणी
अल्पवयीन मुलीशी स्नॅपचॅटद्वारे ओळख निर्माण केली. ओळखीनंतर तिला नग्न अवस्थेतील फोटो पाठविण्यास भाग पाडले. यानंतर मात्र या फोटोच्या आधारे तिला ब्लॅकमेलकरत तिच्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तिघांना पोलिसांनी अटक केली आहे. याबाबत अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दिली आहे. हा प्रकार १ नोव्हेंबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान घडला. आरोपी व पिडीत मुलगी यांची स्नॅपचॅटद्वारे ओळख झाली होती. तिच्याशी जवळीक साधण्यासाठी आरोपींनी सातत्याने तिच्यासोबत स्नॅपचॅटवर अश्लिल चॅटींग केले. तिला स्नॅपचॅटवर कोणाकोणासोबत बोलतेस हे सांगेण अशी धमकी दिली. तिला ब्लॅकमेल करून तिला नग्न फोटो पाठविण्यास भाग पाडुन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे अश्लिल चॅटिंग करून, फोटो व अश्लिल व्हिडीओ पाठवून तिला शरीर सुखाची मागणी केली.