Sangli Girl Suicide: सांगलीतील आटपाडी तालुक्यातील अल्पवयीन तरूणीने केलेल्या आत्महत्येचे प्रकरण चांगलेच तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी आमदार सुहास बाबर आणि आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थकांकडून एकमेकांवर हस्तक्षेप केल्याप्रकरणी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहे. सुहार बाबर यांनी पोलिसांना फोन करून दबाव टाकल्याच आरोप भाजप तालुकाध्यक्षांकडून करण्यात आला आहे. तर शिंदे गटाकडून गोपीचंद पडळकर आणि त्यांचे बंधू ब्रह्मानंद पडळकर यांच्यावरही गंभीर आरोप केले जात आहेत. या प्रकरणात सुहास बाबर आणि पडळकर बंधुंचे कॉल डिटेल्स तपासले जावेत अशी मागणी करण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी सांगलीतील आटपाडी तालुक्यातील एका दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. गावातील चार तरूणांच्या मानसिक आणि शारिरीक त्रासाला कंटाळून या तरूणीने हे टोकाचे पाऊल उचलले होते. या चारजणांपैकी एकाने तिचे लैंगिक शोषणही करून त्या प्रसंगाचा व्हिडीओही तयार केला होता. त्या व्हिडीओचा वापर करूनच हे चौघेजण तिला सातत्याने त्रास देत होते. पण हे प्रकरण दडपण्यासाठी राजकीय हस्तक्षेप झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गोपिचंद पडळकर आणि ब्रह्मानंद पडळकर यांचे कॉल डिटेल्स गृहविभागाकडू तपासले जावेत, अशी मागणी शिंदे सेनेकडू केली जात आहे.
या प्रकरणातील तरूणीने आत्महत्या केल्यानंतरही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. याउलट ग्रामस्थानीच चारपैकी दोघांना पकडून चोप दिला होता. त्यानंतर त्यांना पोलिसांच्याही ताब्यात दिले होते. पण तरीही पोलिसांनी संध्याकाळपर्यंत कोणताही गुन्हा दाखल न करता आत्महत्येचे कारण नोंदवले. पण पीडित तरूणीच्या नातेवाईकांनी आणि ग्रामस्थानी रात्री ११ वाजेपर्यंत पोलीस स्टेशनच्या दारात मृतदेहासह ठिय्या केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यामुळे या प्रकरणात राजकीय दबाव वापरण्यात आल्याचा संशय ग्रामस्थांकडूनही व्यक्त केला जात आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, या प्रकरणात शिंदेसेनेने थेट पडळकर बंधुंकडे बोट दाखवल्याने या प्रकरणात आणखीणच गुढ निर्माण झाले आहे. शिंदे गटाकडून दोन्ही पडळकर बंधुंच्या कॉल डिटेल्स चेक कराव्यात, अशी मागणी केली आहे. शिवसेनेचे तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील, युवासेना प्रमुख मनोज नांगरे, दत्तात्रय पाटील, बाजार समितीचे सभापती संतोष पुजारी यांनी याबाबत निवेदन दिले आहे.