
सांगली: तीन दिवस उपचार, डिस्चार्जनंतर पुन्हा प्रकृती बिघडली; शासकीय रुग्णालयात पती-पत्नीचा मृत्यू
विषारी पदार्थाचे सेवन
मिळालेल्या माहितीनुसार, संजय पाटील आणि त्यांच्या पत्नी मनीषा यांनी २ सप्टेंबर रोजी विषारी पदार्थाचे सेवन केले. त्यानंतर प्रकृती बिघडल्याने नातेवाईकांनी दोघांना पलूस येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्यांना सांगलीतील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले.
डिस्चार्ज नंतर पुन्हा प्रकृती खालावली
सांगलीतील शासकीय रुग्णालयात दोघांवर तीन दिवस उपचार सुरू होते. उपचाराला प्रतिसाद मिळाल्याने प्रकृतीत सुधारणा झाली. त्यामुळे डॉक्टरांनी ५ सप्टेंबर रोजी दुपारी दोघांना डिस्चार्ज दिला. त्यानंतर ते घरी परतले. मात्र, घरी गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दोघांनाही पुन्हा त्रास जाणवू लागला. रविवार, ६ सप्टेंबर रोजी सकाळी प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी त्यांना तातडीने पलूस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तेथून पुढील उपचारासाठी दोघांना मिरज येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. सकाळी सुमारे ११ वाजता त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर मनीषा पाटील यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले. दुसरीकडे संजय पाटील यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. एकाच दिवशी पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने पाटील कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. या घटनेमुळे पलूस परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, कर्जाच्या त्रासामुळे दोघांनी विषारी पदार्थाचे सेवन केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली, तरी या घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी पलूस पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कर्जाचा तगादा, कौटुंबिक परिस्थिती तसेच अन्य कारणांबाबत पोलीस तपास करीत आहेत.