
Scam News: आधी परतावा दिला, विश्वास जिंकला; नंतर २२ लाखांवर डल्ला? शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली फसवणुकीचा आरोप
परताव्याच्या आमिषाने २२ लाखांचा गंडा
रणजित बाळासो शिंदे (रा. शिंदेवाडी, ता. माळशिरस) यांच्या फिर्यादीनुसार, नाळे बंधूंनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला व निश्चित परतावा देण्याचे आश्वासन दिले. त्यावर विश्वास ठेवून शिंदे यांनी बचत, कर्ज तसेच नातेवाईकांकडून उसने घेतलेल्या रकमेतून एकूण २२ लाख रुपये आरोपींकडे गुंतविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. कार्तिक नाळे यांच्या अॅक्सिस बँक खात्यात आणि गौरव नाळे यांच्या एचडीएफसी बँक खात्यात विविध व्यवहारांतून ही रक्कम जमा करण्यात आली. यातील पाच लाख रुपयांच्या गुंतवणुकीसाठी १ सप्टेंबर २०२२ रोजी नोटरीकृत करारनामा करण्यात आला होता. त्यानुसार दरमहा दहा टक्के परतावा देण्याचे नमूद होते. सुरुवातीला काही रक्कम परतावा म्हणून मिळाल्याने गुंतवणूकदाराचा विश्वास वाढला. मात्र, सप्टेंबर २०२३ नंतर परतावा मिळणे बंद झाले. बँक खात्यात अडचण असून पैसे पुढे गुंतविल्याचे तसेच अकाउंट लॉक झाल्याचे कारण आरोपींकडून सांगण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
नाळे बंधू पोलिसांच्या रडारवर
दरम्यान, गु.र.नं. २४९/२०२६ मध्येही कार्तिक व गौरव नाळे यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता आणि एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. ‘बिगबुल इन्स्टिट्यूट ऑफ ट्रेडिंग अँड फायनान्स’ या नावाने अथवा नाळे बंधूंच्या माध्यमातून अन्य नागरिकांचीही फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांनी केले आहे. पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम आणि पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
चौकट : फसवणूक झाली असल्यास पुरावे घेऊन संपर्क साधा
शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक झाली असल्यास नागरिकांनी शक्य असल्यास करारनामा, बँक स्टेटमेंट, चेक, यूपीआय/एनईएफटी/आयएमपीएस व्यवहारांचे तपशील, व्हॉट्सॲप संभाषण, ई-मेल, ट्रेडिंग स्क्रीनशॉट, जाहिराती, डिमॅट/पोर्टफोलिओ स्टेटमेंट किंवा अन्य संबंधित पुरावे सोबत आणावेत. प्राप्त तक्रारींची स्वतंत्रपणे पडताळणी करून, त्या चालू तपासाशी संबंधित असल्यास कायदेशीर प्रक्रियेनुसार समाविष्ट करण्यात येतील.
— श्रीशैल चिवडशेट्टी, पोलीस निरीक्षक