Pune News: शिवाजीराव भोसले सहकारी बँक घोटाळ्यात महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली कटके यांचे नाव पुणे पोलिसांनी तपासातून वगळल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाला सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात मालमत्ता लपवल्याचा दावा करत सामाजिक कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात आमदार कटके यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल केली आहे. त्यामुळे आमदार कटके यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
या घोटाळ्याप्रकरणी बँकेचे संचालक अनिल भोसले व इतरांना २०२० आणि २०२१ मध्ये पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली होती. दरम्यान, आमदार कटके यांनी वाघोली येथील मालमत्ता आणि मयुरी आनंद बिल्डिंगमधील चार फ्लॅट्स गहाण ठेवून सुमारे ९ कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याची माहिती समोर आली होती.
“म्हणून हे फडतूस कॅरेक्टर बोलू लागतात…; भाजप खासदार निशिकांत दुबेंवर आदित्य ठाकरेंचा घणाघात
तिरोडकर यांच्या याचिकेनुसार, अन्य कर्ज थकवणाऱ्यांच्या मालमत्तांवर कारवाई करण्यात आली असली, तरी आमदार कटके यांच्या मालमत्ता केवळ प्रतीकात्मक रित्या जप्त करण्यात आल्या. प्रत्यक्षात त्या मालमत्तांवर आजही कटके यांचा ताबा आहे, असा दावा करण्यात आला आहे. पोलिसांनी ही भूमिका राजकीय दबावाखाली घेतल्याचा आरोपही याचिकेत करण्यात आला आहे.
याचिकेत आणखी एक गंभीर आरोप करण्यात आला असून, एका पीडित महिलेला कटके यांनी करार करून ८० लाख रुपये बँक खात्याद्वारे दिल्याचे नमूद आहे. हे पैसे देखील भोसले बँकेकडून घेतलेल्या कर्जातूनच फिरवण्यात आले, असा ठपका तिरोडकर यांनी ठेवला आहे.तिरोडकर यांनी न्यायालयाकडे विनंती केली आहे की, पुणे पोलिसांनी आमदार कटके यांच्यावर गुन्हा दाखल करावा, तसेच निवडणूक आयोगाने खोटे प्रतिज्ञापत्र सादर केल्याप्रकरणी कारवाई करावी.
आमदार कटके यांनी भागीदारीत असलेल्या आस्थापनांमार्फत एकूण ₹२० कोटी ९५ लाख ८५ हजारांचे कर्ज शिवाजीराव भोसले बँकेकडून घेतले होते. मात्र या प्रकरणात ना आमदार कटके यांच्यावर, ना त्यांच्या भागीदारांवर कोणतीही थेट कारवाई करण्यात आली आहे. याचिकेत असा आरोपही करण्यात आला आहे की, संबंधित गृहप्रकल्पांमध्ये महा-रेरा कायद्याचे उल्लंघन झाले आहे.