आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधून निशिकांत दुबेंवर निशाणा साधला (फोटो - टीम नवराष्ट्र)
AadityaThackeray News : मुंबई : राज्यामध्ये हिंदी विरुद्ध मराठी असा वाद निर्माण झाला आहे. मराठी शाळांमध्ये हिंदी भाषा शिकवण्यावरुन हा वाद सुरु झाला होता. याबाबत दोन्ही शासन आदेश रद्द करण्यात आल्यानंतर देखील वाद थांबलेला नाही. महाराष्ट्रातील मराठी अस्मितेसाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. तसेच मराठी बोलणार नाही असं म्हणणाऱ्यांविरोधात मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामुळे अमराठी राजकीय नेते गंभीर टीका करत आहेत. खास करुन भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी अकेलेचे तारे तोडून मराठी माणसांचा स्वाभिमान दुखावला होता. यावर आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
आमदार आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मराठी माणसांना दुखावऱ्या निशिकांत दुबे यांच्या वक्तव्याचा त्यांनी खरपूस समाचार घेतला आहे. तसेच भाजपवर देखील निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, “महाराष्ट्रामध्ये अनेक लोक राहतात. चांगले व्यवसाय करुन आनंदामध्ये राहत आहेत. मात्र हे जे कोणी फडतूस कॅरेक्टर हे जे भाजपेच खासदार आहेत त्यांना महाराष्ट्रामध्ये आग लावायची आहे. आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची आहे. आणि फक्त येथे नाही तर संपूर्ण देशामध्ये भाजून घ्यायची आहे. म्हणून असे कॅरेक्टर बोलू लागतात,” अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी निशाणा साधला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे ते म्हणाले की, “हे जे भाजपचे नेते आहेत त्यांना आगी लावायच्या आहेत. आणि आम्ही या विरोधामध्ये आहे. हा उत्तर भारतीय नाही. ही भाजपची मानसिकता आहे. महाराष्ट्रामध्ये उत्तर आणि दक्षिण भारतीय अनेक लोक राहतात. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशातून लोक येत असतात. स्वप्न घेऊ येतात. भाजपची ही नीती आहे की तोडा फोडा आणि राज्य करा,” असा टोला ठाकरे गटाचे युवा नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी लगावला आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने मराठी भाषेच्या अस्मितेसाठी एकत्रित विजयी सभा देखील घेतली. यावरुन भाजप नेते टीका करत आहेत. यावर प्रत्युत्तर देताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “आमची लढाई ही सरकारच्या विरोधामध्ये होती. आम्ही कोणत्या भाषेच्या विरोधात लढाई करत नव्हतो. आम्ही सक्तीच्या विरोधात लढत होतो. हिंदी सक्तीच्या विरोधात ही लढाई होती. निशिकांत दुबे हे उत्तर भारतीयांचे प्रतिक नाहीत. आमच्याकडे आनंद दुबे आहेत. जे शिवसेनेमध्ये चांगलं काम करत आहेत. निशिकांत दुबेंसारख्या लोकांना कोणतीही स्पेस दिली नाही तर यांचे हे राजकारण चालणार नाही,” असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.