सौजन्य - नवराष्ट्र टीम
पुणे : पुणे रेल्वे स्थानकातील बुकिंग क्लार्कवर (सीसीटीसी) चाकूने वार करुन लुटमार करणार्या टोळीला बंडगार्डन पोलिसांनी सापळा रचून डोंबिवलीतून अटक केली आहे. पोलिसांनी या भागातील तब्बल १५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींचा माग काढून त्यांना बेड्या ठोकल्या आहेत. चाकणला जाण्यासाठी लाईनमध्ये आल्यानंतर सीसीटीसीने आई-बहिणीवरून शिवीगाळ केल्याच्या रागातून हल्ला केल्याचे समोर आले आहे.
जितेंद्र मोतीराम राठोड (वय २४ रा. चाळीसगाव, डोंबिवली) ईश्वर गोरख चव्हाण (वय २३ रा. दसनाबाद, संभाजीनगर, सध्या- डोंबिवली) अजय मदन चव्हाण (वय २५ रा. डोंबिवली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. ही घटना १८ ऑगस्टला रात्री एकच्या सुमारास तिकीट विक्री केंद्राजवळ घडली होती. ही कारवाई उपायुक्त राजलक्ष्मी शिवणकर, वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे, पोलिस निरीक्षक विनोद सलगरकर, उपनिरीक्षक राहुल पवार, प्रकाश आव्हाड, निलेश पालवे, ज्ञानेश्वर बडे, मनोज भोकरे, प्रदीप शितोळे, महेश जाधव, युवराज गायकवाड यांनी व त्यांच्या पथकाने केली आहे.
तक्रारदार हे पुणे स्टेशनवर वरिष्ठ बुकिंग क्लार्क असून, १८ जुलैला रात्रपाळीला काम करीत होते. तेव्हा एकच्या सुमारास आलेल्या टोळक्याने त्यांच्यावर चाकूने वार करून दोन मोबाइल, सोन्याची चैन हिसकावून नेली. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपास पथकाने १५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून आरोपींचा माग काढला होता. आरोपी हे भोपरगाव कमानी, डोंबिवलीतील असल्याची माहिती पोलिस अमलदार प्रकाश आव्हाड, सारस साळवी यांना मिळाली. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी जाउन २१ ऑगस्टला तिघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
१५० सीसीटीव्ही कॅमेर्यांनी दाखवली वाट
लुटमारीतील आरोपींचा शोध घेण्यासाठी बंडगार्डन तपास पथकाने आजूबाजूच्या १५० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्याद्वारे फोटो मिळवून आरोपींचा माग काढला. त्यानंतर खबर्यांच्या माहितीनुसार पथकाने त्रिकुटाला अटक केली. त्यांच्याकडून दोन मोबाइल, सोन्याची चैन जप्त केली आहे.
जीआरपीएफची चालढकल..!
रेल्वेच्या आवारात घटना घडल्यानंतर देखील जीआरपीएफने याप्रकरणाची दखल घेतली नाही. कारवाई करण्यासाठी चालढकल केली आणि गुन्हा नोंदवण्यासाठी बंडगार्डन पोलिस पाठविले. त्यामुळे काही दिवस वेळ आरोपींना मिळाला, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली.






