संग्रहित फोटो
शिक्रापूर : सोशल मीडियाच्या माध्यमातून एका २३ वर्षीय तरुणाची ओळख वाढवून, त्याच्याशी अश्लील स्वरूपाच्या चर्चा करत त्याला विविध आमिषे दाखवून शिक्रापूर येथे बोलावून घेण्यात आले. त्यानंतर त्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून ५० हजार रुपयांची मागणी करत आर्थिक खंडणी उकळण्याचा डाव शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळून लावण्यात आला आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिसांनी दोन महिलांसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी शितल संजय डाके (रा. करंजेनगर, शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे), वैष्णवी आकाश गायकवाड, आकाश चिंतामण गायकवाड (दोघेही रा. जातेगाव बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे) आणि शुभम कांडगे (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) यांच्याविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार श्रावण गुपचे आणि योगेश आव्हाड हे २३ ऑगस्ट रोजी रात्री गस्त घालत असताना शिक्रापूर बसस्थानकाजवळ दोन तरुण संशयास्पदरीत्या उभे असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी त्यांना हटकून घरी जाण्यास सांगितले. काही वेळाने पोलिसांचे पथक पुन्हा त्याच ठिकाणी आले असता दोन्ही तरुण तेथेच उभे असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी त्यांची पुन्हा चौकशी केली. यावेळी त्यापैकी एका तरुणाने घाबरलेल्या अवस्थेत पोलिसांकडे मदतीची मागणी केली.
५० हजारांची मागणी; खोट्या गुन्ह्याची धमकी
पोलिसांनी तरुणाला धीर देत सविस्तर विचारपूस केली असता, शितल डाके आणि वैष्णवी गायकवाड या महिलांसह काही तरुणांशी सोशल मीडियावरून त्याची ओळख झाली असल्याचे त्याने सांगितले. या व्यक्तींनी त्याच्याशी अश्लील स्वरूपाच्या विविध चर्चा केल्या आणि त्याला शिक्रापूर येथे बोलावून घेतले. त्यानंतर त्याच्याकडे ५० हजार रुपयांची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात देण्याची तसेच त्याच्यावर ॲट्रॉसिटीचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देण्यात आल्याचे तरुणाने पोलिसांना सांगितले.
हे सुद्धा वाचा : दारूच्या नशेत वाद, महिलेने दगडाने ठेचून एकाला संपवलं; पुणे जिल्ह्यातील घटनेनं खळबळ
पोलिसांनी संशयितांना घेतले ताब्यात
घटनेची माहिती पोलीस हवालदार श्रावण गुपचे यांनी तातडीने पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करत तरुणाला हनीट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला व युवकांना शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसांनी संशयितांचे मोबाईल फोन जप्त करून त्यांची चौकशी केली असता संपूर्ण हनीट्रॅपचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी पीडित २३ वर्षीय युवकाने शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर संबंधित चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार सचिन काळे करीत आहेत.






