
आमदार तनपुरेंच्या घरात चोरी; महागडी बॅग, अॅपल एअरपॉड अन् लिप पेन्सिल गायब
पुणे : विधानपरिषदेचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या घरातून अज्ञात व्यक्तीने ९० हजार ९१६ रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. यामध्ये लुई व्हिटॉन कंपनीची महागडी बॅग, अॅपल कंपनीचे एअरपॉड, कपड्यांचा सूट सेट आणि लिप पेन्सिल अशा वस्तूंचा समावेश आहे. याप्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सोनाली तनपुरे यांच्या सांगण्यावरून यांच्या वाहनावरील चालक संग्राम चंद्रभान तमनेर (वय २२) यांनी तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आमदार तनपुरे यांची विमाननगर येथील लुंकड स्काय व्हिला सोसायटीत सदनिका आहे. २२ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत ही चोरी झाली. २२ ऑक्टोबर रोजी घरातील लुई व्हिटॉन कंपनीची काळ्या रंगाची बॅग मिळून येत नसल्याचे त्यांच्या पत्नी सोनाली तनपुरे यांनी चालकाला सांगितले. त्यानंतर तमनेर यांनी घरातील काम करणाऱ्या महिलांच्या मदतीने बॅगचा शोध घेतला. मात्र, ती मिळून आली नाही. काही दिवसांनी घरातील अॅपल कंपनीचे एअरपॉड्स, रबिया कंपनीचा सूट सेट आणि एम.ए.सी. कंपनीची लिप पेन्सिलही गायब असल्याचे निदर्शनास आले.
दरम्यान, घरात सर्वत्र शोध घेऊनही या वस्तू मिळून न आल्याने चोरी झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. सदनिकेत कामासाठी येणाऱ्या महिलांपैकी दोघींवर फिर्यादीने संशय व्यक्त केला आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणताही निष्कर्ष निघालेला नाही. एकूण ९० हजार ९१६ रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. उपनिरीक्षक अक्षय सोनवणे तपास करत आहेत.
FAQ
1. आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या घरात किती रुपयांची चोरी झाली?
त्यांच्या घरातून ९० हजार ९१६ रुपये किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे.
2. चोरीला गेलेल्या वस्तू कोणत्या आहेत?
लुई व्हिटॉन कंपनीची बॅग, अॅपल एअरपॉड्स, रबिया कंपनीचा सूट सेट आणि एम.ए.सी. कंपनीची लिप पेन्सिल चोरीला गेली आहे.
3. चोरीची घटना कुठे घडली?
पुण्यातील विमाननगर परिसरातील लुंकड स्काय व्हिला सोसायटीत ही घटना घडली.