संग्रहित फोटो
पुणे : पुण्यात कोम्बिंग ऑपरेशन, रात्रीची गस्त, नाकाबंदी आणि गुन्हेगारांविरोधातील विशेष मोहिमांमुळे रस्त्यावरील गुन्हेगारीला काही प्रमाणात ब्रेक लागल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे. खूनाचा प्रयत्न, दुखापत, चैन स्नॅचिंग व जबरी चोरीच्या घटनांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मोठी घट झाली आहे. विशेषतः जबरी चोरीच्या घटना तब्बल ९५ ने घट झाली आहे. मात्र, खूनाच्या घटना आणि दरोड्यांमध्ये वाढ झाल्याने गंभीर गुन्हेगारीचा धोका कायम असल्याचेही आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
पुणे शहरातील गुन्हेगारीचा आलेख वाढत असतानाच चालू वर्षातील सहा महिन्यांच्या आकडेवारीचे सुखावणारे चित्र आहे. पुणेकर अधून-मधून होणाऱ्या गोळीबार, कोयत्याने हाणामारी तसेच तोडफोडीने दहशतीत असतात. दुसरीकडे फटाका सायलेन्सर व त्यावरून अंधाऱ्या रात्री फिरणाऱ्या टोळक्यांमुळे देखील मनात धडकी भरलेली असते. अशा घटना आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी जाणीवपुर्वक लक्ष केंद्रीत केले. सराईत गुन्हेगारांची धरपकड, कोम्बिंग ऑपरेशन, संवेदनशील भागात रात्रीची गस्त, नाकाबंदी तसेच संशयितांची तपासणी अशा उपाययोजना सातत्याने राबविल्या. अचानक राबविलेल्या या मोहिमांचा परिणाम प्रामुख्याने रस्त्यावर घडणाऱ्या गुन्ह्यांना लगाम लागण्यावर झाल्याचे दिसत आहे. शहरातील गुन्हेगारीचा सारासार विचार केला असता, पोलिसांच्या आकडेवारीतून यंदा अनेक गंभीर आणि रस्त्यावर घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत लक्षणीय घट झाल्याचे दिसून येत आहे. विशेषतः खूनाचा प्रयत्न, दुखापत, चैन स्नॅचिंग आणि जबरी चोरीच्या घटनांमध्ये घट झाली आहे. मात्र, दरोड्याच्या घटनांमध्ये यंदा वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.
यंदा ७ ऑगस्टपर्यंत ६१ खुनाच्या घटना घडल्या. गेल्या दोन वर्षांत ऑगस्टपर्यंत अनुक्रमे ५२ आणि ५७ खुनांची नोंद झाली होती. त्यामुळे खुनाच्या घटनांमध्ये मात्र अपेक्षित घट झाली नसली तरी खूनाच्या प्रयत्नाच्या घटनांमध्ये मोठी घट झाली आहे. यंदा आतापर्यंत ८२ घटना घडल्या असून, गेल्या वर्षी याच कालावधीत १०७ गुन्हे नोंदविले होते. दुखापतीच्या गुन्ह्यांमध्येही घट झाली असून, यंदा ८६२ घटना नोंदल्या गेल्या आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा ९२३ होता. चैनस्नॅचिंगमध्ये यंदा ६४ घटना घडल्या असून, गेल्या वर्षी तब्बल १११ घटना नोंदल्या होत्या. जबरी चोरीतही १५२ घटना नोंदल्या असून, मागील वर्षी हा आकडा २४७ होता. मात्र, दरोड्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यंदा ऑगस्टपर्यंत सात दरोडे नोंदविण्यात आले असून, गेल्या वर्षी याच कालावधीत चार घटना घडल्या होत्या. त्यामुळे स्ट्रीट क्राईममध्ये एकूणच घट दिसत असली तरी काही गंभीर प्रकार पोलिसांसाठी अद्याप आव्हान ठरत आहेत.
हे सुद्धा वाचा : नोकरीला निघाले अन् काळाने घातली झडप; खासगी बस-कंटेनरच्या धडकेत एकाचा मृत्यू
पुणे पोलीसः अपराध सांख्यिकी तुलना
| गुन्ह्याचा प्रकार | यंदा ( ऑगस्टपर्यंत) | गेल्या वर्षी (ऑगस्टपर्यंत) | फरक |
|---|---|---|---|
| खून | ६१ | ५७ | +४ |
| खूनाचा प्रयत्न | ८२ | १०७ | २५ |
| दुखापत | ८६२ | ९२३ | ६१ |
| दरोडा | ७ | ४ | +३ |
| चैनस्नॅचिंग | ६४ | १११ | ४७ |
| जबरी चोरी | १५२ | २४७ | ९५ |
ठळक निरीक्षणे
खूनाचा प्रयत्न : सुमारे २३% घट
दुखापत : सुमारे ७% घट
चैनस्नॅचिंग : सुमारे ४२% घट
जबरी चोरी : सुमारे ३८% घट
दरोडा : ३ घटनांनी वाढ
खून : गेल्या वर्षीच्या तुलनेत ४ ने वाढ
गोळीबाराने दहशतमय वातावरण..!
पुणे शहरात गेल्या वर्षांपासून सुरू असलेले दोन गँगमधील टोळी युद्ध अन् त्यामुळे निर्माण होणाऱ्या दहशतीसोबतच शहरात लहान मुलांकडून तसेच गुन्हेगारांकडून सतत होणाऱ्या गोळीबाराने दहशतीचे वातावरण कायम ठेवले आहे. या घटना सातत्याने वाढत असल्याचे देखील दिसत असून, गेल्या सात महिन्यात जवळपास ३० घटना घडल्या आहेत. दुसरीकडे पोलिस पिस्तूल तयार होणाऱ्या गावांसह तेथून आणणाऱ्या एंजटवर कारवाई करत असताना या घटना वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.






