शिक्षकाकडून तीन विद्यार्थ्यांनीचा लैंगिक छळ, अंबरनाथमधील धक्कादायक प्रकार (फोटो सौजन्य-X)
Ambernath Crime News : अंबरनाथ पश्चिमेतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. खाजगी संस्थेच्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या ३ अल्पवयीन विद्यार्थ्यांसोबत शिक्षकाने लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थी शाळेत जात नसल्याने खेळाचं प्रशिक्षण देणाऱ्या शिक्षकाने विद्यार्थ्यांकडे विचारपूस केली, त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नराधम शिक्षकाविरोधात अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी नराधम शिक्षकाला अटक केली असून आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आर्थिक परिस्थिती नाजूक असलेले गोरगरीब विद्यार्थी संस्थेच्या मुक्त शाळेत शिक्षण घेत आहेत. यापैकी ९ ते १५ वयोगटातील तीन विद्यार्थ्याचा शिक्षकाने लैंगिक छळ केल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी तक्रार प्राप्त होताच अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात शिक्षकाविरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तात्काळ नराधम शिक्षकाला अटक करण्यात आली असून आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे दिली आहे.