समृद्धी महामार्गावर विचित्र अपघात; जखमींना बाहेर काढताना आणखी एक अपघात
वर्धा : गेल्या काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावर अपघाताच्या घटना सातत्याने घडताना दिसत आहे. त्यात शनिवारी झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला. तर बचाव कार्यात सहभागी असलेल्या क्यूआरव्ही टीममधील एका कर्मचाऱ्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना शनिवारी (दि.4) नागपूर कॉरिडॉरच्या जवळ घडली.
उत्तर प्रदेशातील आंबेडकरनगर येथील रहिवासी मोहम्मद समीर मोहम्मद अख्तर (वय 23) हा त्याच्याकडील ट्रकने (यूपी-45/7576) गुजरातमधील वापी येथून कोलकाता येथे जात होता. दरम्यान, नागपूर कॉरिडोरमधून जात असताना, नागपूर कॉरिडॉरच्या चेंज नंबर 42:800 जवळ, चालकाला डुलकी लागली आणि त्याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि वाहन पहिल्या प्लॅनवर जाऊन पटली झाले. अपघाताची माहिती मिळताच, बचाव पथक घटनास्थळी पोहोचले. महामार्गावर इंजिन ब्लॉक्स विखुरलेल्या अवस्थेत असल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. इतकेच नाहीतर महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी वळवण्यातही आली.
दरम्यान, बचाव पथक काम करत असताना, त्याच कॉरिडॉरवरून येणारा अनियंत्रित ट्रेलर (एमएच-43/बीएक्स-8479) अपघातग्रस्त ट्रकला धडकला. या ट्रेलरमध्ये इंजिन ब्लॉक्स भरलेले होते. तो मुंबईहून नागपूरला जात होता. या अपघातात ट्रेलरचा चालक सतनाम सिंग कुलवंत सिंग संधू यांचा मृत्यू झाला. तसेच बचाव कार्यात सहभागी असलेल्या क्यूआरव्ही टीमचा कर्मचारी प्रतीक राखुंडे (वय 33) गंभीर जखमी झाला. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
जखमी प्रतीकवर रुग्णालयात उपचार सुरु
जखमी प्रतीक राखुंडे यांच्यावर सावंगी मेघे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर गस्तीवर असलेले समृद्धी महामार्गाचे पीएसआय दिलीप थाटे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. सेलू पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
यापूर्वीही अनेकदा झाले अपघात
समृद्धी महामार्गावर अपघातांचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. त्यात आता पुन्हा एकदा या मार्गावर अपघाताची घटना समोर आली. तर काही दिवसांपूर्वीही महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर कॉक्रीट टँकर धडकला होता. यात टँकरच्या क्लीनरचा मृत्यू झाला तर चालक गंभीर जखमी झाला होता. सतीशसिंग विजयसिंग (वय 37) असे यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर रामचंद्र पाल (वय 36) असे टँकरचालकाचे नाव आहे. त्यानंतर आता ही घटना समोर आली आहे.